मुंबई - लेखिका आशापूर्णा देवीची कथा 'चुटी नकोच' वाचताच निर्माता सुमन मुखोपाध्याय यांना असे वाटले, की यावर चित्रपट बनवला पाहिजे. त्यानंतर त्यांनी या कथेचे अधिकार विकत घेतले आणि पटकथा लिहायला सुरुवात केली. चित्रपटाचे शीर्षक ठेवले 'नजरबंद'. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार असून या चित्रपटाचा हा वर्ल्ड प्रीमियर असेल.
मुखोपाध्याय यांनी म्हटले, "हा एक मनोवैज्ञानिक चित्रपट आहे. यात वासंती आणि चंदू या दोन पात्रांमधील प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. जर प्रेक्षक या व्यक्तीरेखांचा मनोवैज्ञानिक संघर्ष, त्यातील नाजुकपणा आणि अस्थिरता याच्यासोबत पुढे गेले तर हा चित्रपट काम करेल.''
'हर्बर्ट', 'पोशम पा' आणि 'कंगल मालसॅट' ('वॉर क्राई ऑफ द बेगर्स') यासारख्या चित्रपटांबद्दल राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुमन मुखोपाध्याय यांचे कौतुक झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला तर 'नजरबंद' चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळेल याबाबत ते साशंक आहेत.
ते म्हणाले, "हे कठीण दिसत आहे, परंतु आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत. अलिकडच्या काळात आम्ही पाहिले आहे की ओटीटी प्लॅटफॉर्मकडे स्टार कास्ट आणि मुख्य प्रवाहातील चित्रपटांचा अधिक कल आहे. याचा अर्थ या प्रकारच्या चित्रपटांना स्लॉट मिळविणे अवघड आहे. परंतु आम्ही उत्सवाच्या सर्किटमध्ये स्लॉट घेण्याची प्रतीक्षा करू."