मुंबई - 'मराठी बिग बॉस'च्या पहिले पर्व यशस्वी ठरल्यानंतर आता लवकरच दुसरे पर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकर हे या दुसऱ्या पर्वाचे सुत्रसंचालन करणार आहेत. या कार्यक्रमाचा टीजर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या टीजरमध्ये महेश मांजरेकरांचा मराठमोळा लूक पाहायला मिळाला. आता त्यांचा रॅपर लूक प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.
महेश मांजरेकर यांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो शेअर करून 'ऐका बहिणींनो आणि भावांनो... मी येतोय सांगायला तुम्हाला परवा एक रॅपचिक गोष्ट..', असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे ते कोणती गोष्ट सांगणार आहेत, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

मराठीमध्येही सध्या रॅप गाण्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे. बऱ्याच कार्यक्रमाचे शिर्षक गीतही रॅपमधूनच सादर करण्यात येत आहे. त्यामुळे 'मराठी बिग बॉस'चे शिर्षकही रॅपच असणार, असा अंदाच प्रेक्षक व्यक्त करत आहेत. महेश मांजरेकरांचा या रॅप गाण्यासाठी हटके लूक सादर केला आहे. डॅपर लूक आणि विंटेज बीटल रेट्रो गाडीवर बसलेला त्यांचा रॅपरच्या लूकला चाहत्यांचीही पसंती मिळत आहे.
यावर्षीच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार, तसेच या कार्यक्रमाची थीम काय असणार, याबद्दल सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा रंगल्या आहेत.