लॅाकडाऊननंतर सिनेमांचं काय होणार ही भ्रांत निर्मात्यांना भेडसावत होती. परंतु सिनेमागृहे उघडल्यावर हिंदीत ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित झाला आणि हिट ठरला. त्याचप्रमाणे मराठीत नुकताच ‘झिम्मा’ प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. ‘झिम्मा’ चित्रपटगृहांमध्ये सुपरहिट ठरलेला पहिला मराठी चित्रपट ठरतोय. यामुळे मराठीतील इतर निर्मात्यांना त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल हे निश्चित.
प्रेक्षकांच्या प्रतिक्षेला विराम देत १९ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात 'झिम्मा' प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याचे सर्व शोज हाऊसफुल्ल जात आहेत. विकएंडला संपूर्ण महाराष्ट्रात सर्व चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले होते तर 'झिम्मा'चे प्री बुकिंगही जोरदार सुरु आहे. विशेष म्हणजे विकएंडला ठाण्यातील एका मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाचे १८ शोज लागले होते आणि ते सगळेच्या सगळे हाऊसफुल्ल होते.
![‘झिम्मा’ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-zimma-housefull-in-theatres-mhc10001_26112021012243_2611f_1637869963_915.jpeg)
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
![‘झिम्मा’ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-zimma-housefull-in-theatres-mhc10001_26112021012243_2611f_1637869963_503.jpeg)
'झिम्मा' चित्रपटाला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ''सर्वप्रथम 'झिम्मा'ला मिळत असणाऱ्या प्रेमाबद्दल मी सर्व मराठी प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांच्या या पाठिंब्यामुळे एक प्रकारचे बळ मिळाले आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी चित्रपटसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. विशेष म्हणजे शासनाच्या नियमांनुसार पन्नास टक्के सीट्सची परवानगी असूनही कोरोनाबद्दलच्या भीतीवर मात करत, प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येऊन चित्रपटाचा आनंद घेत आहेत.’’
प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांकडूनही ‘झिम्मा’ चे प्रचंड कौतुक होत असून वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल्स, सिनेसृष्टीकडूनही त्याला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. सोशल मीडियावरही ‘झिम्मा’ ची जोरदार चर्चा सुरु आहे.
हेही वाचा - मी शीख समाजाचा आब राखत भूमिका साकारली, ‘सरदार इज किंग’ म्हणाला सलमान खान