दिवंगत अभिनेते विजू खोटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरातील पु. ल. देशपांडे सभागृहात श्रद्धांजली सभेच आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, आयुष्यभर आनंदाने जगलेल्या आणि प्रत्येकाला आनंद वाटलेल्या विजू खोटे यांची श्रद्धांजली सभा देखील एक आनंद सोहळा ठरली.
विजू खोटे हे स्वभावाने जेवढे गोड होते तेवढेच मिश्किल सुध्दा होते. त्यामुळे त्यांच्या गप्पांचे आणि खाण्याचे अनेक किस्से त्यांच्या मित्राकडे आहेत. याच किश्शांचा खजिना या निमित्ताने लोकांसमोर उलगडला.
या श्रद्धांजली सभेसाठी बॉलिवूड, मराठी आणि इंग्रजी थिएटर मधील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. यात प्रामुख्याने विकासक आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, दिग्दर्शक भरत दाभोळकर, निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, अभिनेते सतीश शहा, जॉनी लिव्हर, बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ, दिग्दर्शक महेश टिळेकर, अभिनेता समीर चौगुले असे अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. या सगळ्यांनी मिळून विजू खोटे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी उपस्थित असलेल्या विजूजींच्या कुटूंबियांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यासोबत विजू काका आजारी असताना कसे आपल्या ओळखीतल्या लोकांकडे जाऊन चहा प्यायचे याची मोठी मजेशीर आठवण त्यांचा सुनेने सांगितली. तर भरत दाभोळकर यांनी त्यांच्या इंग्लिश थिएटरच्या आठवणी शेअर केल्या. सचिन पिळगांवकर यांनी 'अशी ही बनवाबनवी' आणि 'गम्मत जम्मत' या सिनेमाचे काही किस्से सांगितले. तर किशोर चौगुले आणि महेश टिळेकर यांनी ते किती अव्वल दर्जाचे खवय्ये होते ते आवर्जून सांगितलं.
विजू खोटेच्या कुटूंबियांनी भरत दाभोळकर आणि महेश टिळेकर या दोघांनी विजू काकांना अखेरपर्यंत साथ दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. त्यासोबतच विजू काका जिथे कुठे असतील तिथून आपल्या शोकसभेत कुणी रडल्यापेक्षा हसत होते याचंच त्यांना जास्त समाधान वाटलं असेल असं नमूद केलं.