नागपूर - ख्यातनाम संगीतकार राम-लक्ष्मण यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका महान संगीतकाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
राम-लक्ष्मण या जोडीला सिनेसृष्टी कधीही विसरू शकत नाही. या जोडीतील राम अर्थात सुरेंद्र यांचे 1977 मध्येच निधन झाले. पण, रामलक्ष्मण हे नाव विजय पाटील यांनी पुढेही कायम ठेवले होते. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ-साथ है’ अशा गाजलेल्या चित्रपटांतील गीतांना त्यांनी संगीत दिले होते.
प्रारंभी एका ऑर्केस्ट्रापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला नागपुरात प्रारंभ केला आणि नंतर मराठी चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. यासाठी पुढाकार दादा कोंडके यांचा. या जोडीचे नामकरण रामलक्ष्मण केले, तेच मुळात दादा कोंडके यांनी. दादा कोंडके यांनी अखेरपर्यंत त्यांना साथ दिली. पुढे रामलक्ष्मण यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. अतिशय साधेपणा आणि विनम्रभाव हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य होते.
मराठी अभिनेते आणि चित्रपट निर्माते दादा कोंडोके यांनी १९७४ मध्ये पांडू हवालदार या चित्रपटाचे संगीतकार म्हणून त्यांना साइन अप केले होते. पुढे, पाटील यांनी तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम आणि बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातील गाणी संगीतबध्द केली.
नागपूरकर म्हणून अभिमान
एक नागपूरकर म्हणून त्यांच्या कारकिर्दीचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. आज केवळ नागपूरकर नाही तर संपूर्ण देश एका महान संगीतकाराला हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय आणि लाखो संगीतप्रेमींच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - प्रख्यात संगीतकार लक्ष्मण उर्फ विजय पाटील काळाच्या पडद्याआड