कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी ४ दिवसांपूर्वी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन अध्यक्ष मेघराज भोसले यांच्यावर धनादेश चोरीसह धान्यवाटपाच्या घोळाचे आरोप केले होते. त्यांच्या आरोपांचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी आज खंडन केले आहे. शिवाय धनाजी यमकर यांच्यावरच आता धमकी आणि बदनामी केल्याबाबत गुन्हा दाखल करणार असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे. कोल्हापूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी मेघराज भोसले म्हणाले, चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर आणि विजय पाटकर यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आमची बदनामी करण्याचा केलेला प्लॅन आहे. यमकर यांनी केलेल्या आरोपांची पोलीसांनी सुद्धा माहिती घेतली आहे. त्यामध्ये काहीही तथ्य नाहीये. याबाबत मी स्वतः त्यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. यमकर यांनी धमकीचे फोन केले आहेत याबाबत सुद्धा पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे मेघराज भोसले यांनी म्हंटले आहे. शिवाय चेक चोरीचे केलेले आरोप सुद्धा खोटे असून विजय पाटकर हे धनाजी यमकर यांची ढाल करून आरोप करत आहेत. आशा लोकांमुळे महामंडळाची प्रतिमा मालिन होत आहे ती आम्ही होऊ देणार नसल्याचेही भोसले यांनी म्हंटले.
काय आहे नेमकं प्रकरण ?
४ दिवसांपूर्वी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यमान अध्यक्ष मेघराज भोसले यांच्यासह संचालक मंडळावर आरोप केले होते. शिवाय त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. गेल्या 1 वर्षांपासून अध्यक्ष मनमानी करत आहेत. टाळेबंदीच्या काळात अनेक सभासदांना मदत म्हणून धान्य आणि आर्थिक मदत गोळा करण्यात आली. त्या गोळा केलेल्या मदतीमधील धान्यवाटपात त्यांनी घोळ केला आहे, तसेच चेक चोरी प्रकरण केले आहे. एव्हढेच नाही तर चित्रपट महामंडळाला ५४ वर्षाची परंपरा आहे. मात्र चित्रपटांची ही मातृसंस्था अध्यक्ष भोसले मनमानी पद्धतीने महामंडळाच्या घशात घालत असल्याचा आरोप सुद्धा यमकर यांनी केला होता. यमकर यांच्या या आरोपांनंतर अध्यक्ष भोसले यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या सर्व आरोपांचे खंडन करून उलट यमकर यांच्यावरच अब्रू नुकसानीसह धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल करणार असल्याचे भोसले यांनी म्हंटले आहे.