मुंबई- अभय ठाकूर दिग्दर्शित ‘इनिग्मा : द फॉलन एंजल’ या शॉर्टफिल्मने जगभरातील विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपला अमिट ठसा उमटवत उतुंग कामगिरी बजावली आहे. मानसिक आरोग्यावर भाष्य करणार्या या शॉर्टफिल्मचा वर्ल्ड प्रिमियर अतिशय प्रतिष्ठेच्या ‘पॅरिस प्ले फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये होणार असून चाहत्यांना घरी बसून या शॉर्टफिल्मचा आनंद घेता येणार आहे.
चित्रपटांसोबत लघुपटांनाही महत्व
गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटांसोबत लघुपटांनाही महत्व प्राप्त झाले आहे. बहुतांशी सर्वच अवॉर्ड्स फंक्शन्समध्ये शॉर्ट फिल्म्सलाही अवॉर्ड्स दिले जात आहेत. तसेच फिल्म्स फेस्टिवल्समध्येसुद्धा त्यांना मान मिळू लागलाय. खरंतर शॉर्ट फिल्म हा प्रकार कमी वेळात मोठा परिणाम साधू शकतो व मोठे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुद्धा या प्रकाराला पाठिंबा देताना दिसत आहेत. मानसिक आरोग्यावर वेगळ्या अंदाजात भाष्य करणार्या, ड्रीम कॅचर मोशन पिक्चर कंपनी, स्नोफ्लेक स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘इनिग्मा:द फॉलन एंजल’ या शॉर्टफिल्ममध्ये रुचिता जाधव, यतीन कार्येकर, अनन्या सेनगुप्ता, शंतनू मोघे, मीरा पाथरकर, रणजीत जोग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाला २५ हून अधिक पारितोषके
'पॅरिस प्ले फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये जगभरातून आलेल्या अनेक शॉर्टफिल्म्स मधून १४ देशातील २८ शॉर्टफिल्म्सची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ‘इनिग्मा : द फॉलन एंजल’ या एकामेव भारतीय शॉर्टफिल्मची निवड सेमी फायनालिस्ट म्हणून करण्यात आली आहे. ‘इनिग्मा : द फॉलन एंजल’ने यापूर्वी वर्ल्ड फिल्म कार्निव्हल, सिंगापूर, कोलकाता इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्डस, टागोर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, यूरोपीयन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल युके, यूरोपीयन सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड ऍमस्टरडॅम फेस्टिव्हल, उरूवती इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, तामिळनाडू, लाएज डी’ऑर इंटरनॅशनल आर्टहाऊस फिल्म फेस्टिवल, कोलकाता, पोर्ट ब्लेयर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म अवॉर्डस, ओनिरस फिल्म अवॉर्डस मॅनहॅटन, न्यूयॉर्क इत्यादि फिल्म फेस्टिव्हल्समध्ये ऑफिशियल निवड, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासह २५ हून अधिक विविध पारितोषिके पटकावली आहेत.