मुंबई - पाणीप्रश्नावर आधारित 'एक होतं पाणी' या सिनेमाच ट्रेलर आणि म्युझिक अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते मुंबईत लाँच करण्यात आलं. पाण्याचं महत्त्व लोकांना समजावं यासाठी हा सिनेमा येत्या १० मे रोजी आपल्या भेटीला येणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शक रोहन सातघरे निर्माते आणि कलाकारांच्या उपस्थितीत हा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा रंगला.
याप्रसंगी चित्रपटाचा ट्रेलर पाहून अतिशय भावूक होत वर्षा उसगांवकर यांनी, ''पाणी वाचवणं ही काळाची गरज झाली असून चित्रपटातून होणारं प्रबोधन हे मोठ्या स्तरावर होत असतं, त्यामुळे असे विषय सातत्याने येत राहावेत'' असे त्यांनी मत मांडले. तसेच निर्माते-दिग्दर्शक आणि लेखकाचे विशेष कौतुक करत चित्रपटाच्या ह्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 'बोभाटा', 'भान राहील', 'चला चला', आणि 'एक होतं पाणी' अशी चार गाणी या चित्रपटात असून ही चारही गाणी कथाविषयाला पूरक आहेत. वेगवेगळ्या धाटणीच्या या गाण्यांतून पाण्याचे गांभीर्य सांगण्यात मदत होते.
आशिष निनगूरकर यांच्या लेखणीतून ही चारही गाणी शब्दबद्ध झाली आहेत. विकास जोशी यांच्या सुरेल संगीताची या गाण्यांना जोड लाभली आहे. शिवाय मराठी मनोरंजन क्षेत्रातल्या नामवंत गायकांनी ही गाणी गायली आहेत. ज्यात आनंदी जोशी, हृषीकेश रानडे, रोहित राऊत, मृण्मयी दडके पाटील आणि विकास जोशी यांचा समावेश आहे.
अनेक चित्रपट महोत्सवांत यशस्वी मोहोर उमटवणाऱ्या 'एक होतं पाणी'ने 'अंबरनाथ चित्रपट महोत्सवा'मध्ये तब्ब्ल ६ नामांकनं पटकावलेली, त्यातील २ पुरस्कारांवर म्हणजेच 'सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगूरकर' आणि 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार चैत्रा भुजबळ या पुरस्कारांवर आपला ठसा उमटवला आहे. तर 'इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिवलमध्ये; 'विशेष लक्षवेधी परीक्षक पसंती या पुरस्काराने या चित्रपटाला गौरवण्यात आले आहे. 'एक होता राजा..एक होती राणी आता म्हणू नका 'एक होतं पाणी', अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे.
ही एका अशा गावाची गोष्ट आहे, ज्यात गावासाठी पाण्याची सोय प्रशासनाने केली आहे. टँकरची नोंदही कागदोपत्री सापडते, पण गावात मात्र पाण्याचा एक थेंबही नाही. पाण्याअभावी आतापर्यंत कित्येक गावकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे पाणी नेमकं जातं तरी कुठे... प्रशासनाचा हा अंधाधुंद कारभार कोणाच्याच लक्षात येऊ नये... पाण्यासाठी वणवण करणाऱ्या गावकऱ्यांनी जायचं कुठे-करायचं तरी काय या आणि अशा अनेक प्रश्नांना उत्तर देणार तरी कोण... याचा उहापोह 'एक होतं पाणी' या सिनेमातून करण्यात आला आहे.