सोलापूर - 'छपाक' गर्ल दीपिका पदुकोणला कुठल्याही प्रकारच्या स्टंटबाजी करायची गरजच नाही. ती ज्या चित्रपटात काम करते, तो चित्रपट प्रसिद्ध होत असतो. त्यामुळं 'छपाक'च्या निमित्ताने स्टंटबाजी करण्यासाठी दीपिका पदुकोण जेएनयू विद्यापीठात गेली होती, असं मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकार हिनं दिलीय. अप्रत्यक्षपणे दीपिकाच्या भूमिकेच समर्थन करताना वर्षानं आपल्याला जे काम चांगलं वाटतं ते काम करायला हवं, असं सांगत'कुछ तो लोग कहेंगे ..लोगों का काम है कहना'..असा सूचक डायलॉग मारलाय.
नॅशनल एज्युकेशन अँड सोशल ट्रस्टच्यावतीने जाहीर करण्यात आलेला सामाजिक कला गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी वर्षा उसगांवकार आज सोलापुरात आली होती. त्यावेळी तिनं सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालापादरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांना मोकळेपणानं उत्तरं दिली.
त्यावेळी बोलताना वर्षांनं महत्वाच्या अशा दीपिका पदुकोणची जेएनयू भेट आणि मिटू प्रकरणी लक्षवेधी प्रतिक्रिया दिलीय.
मिटू प्रकरणावर बोलताना तिनं नाना पाटेकर विषयी कांहीही न बोलता, हैदराबाद येथील अभिनेत्रीच्या नग्न आंदोलनाचा संदर्भ देत स्त्री आपली लाज सोडत नसते, त्यामुळं जिथे आग लागलेली असते तिथे धूर निघतोचं असं म्हंटलंय. पण मिटू प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर आता चित्रपट सृष्टीतल्या अनेकांचे धाबे दणाणले असून लैंगिक शोषण करणाऱ्या कुप्रवृत्तीनां चांगलीच जरब बसल्याची प्रतिक्रिया दिलीय.