मुंबई - सोशल मीडियावर आजकाल मिम्स व्हायरल होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. एखादी घटना असो, व्यक्ती असो, चित्रपट असो किंवा काहीही त्यावर मिम्स तयार करुन व्हायरल केले जातात. आता विराट कोहलीने राणी एलीझाबेध यांच्या भेटीचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोवर सध्या मिम्स व्हायरल होत आहेत. हे मिम्स एवढे मजेदार आहेत, की यातला एक मिम खुद्द अनिल कपूर यांनीदेखील त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
'आयसीसी विश्वचषक २०१९' स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यंदाचा क्रिकेट विश्वकरंडक इंग्लंड आणि वेल्समध्ये होत असून इंग्लंडची राजधानी लंडन येथे या स्पर्धेचे उद्घाटन झाले. ३० मे ते १४ जुलैपर्यंत होणाऱ्या विश्वकरंडकासाठी जगभरातून १० संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान विराट कोहलीसह इतरही देशाच्या क्रिकेट संघ कर्णधारांनी राणी एलिझाबेध यांची भेट घेतली. विराटने या भेटीचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोवर मिम तयार करताना यामध्ये अनिल कपूर यांच्या वेलकम चित्रपटातील एका चित्राचे फोटोशॉप करण्यात आले आहे. 'वेलकम' चित्रपटात अनिल कपूर यांनी 'मजनू भाई'ची भूमिका साकारली होती. यामध्ये त्यांनी घोड्यावर एका गाढवाचे चित्र काढले होते. हे चित्र अतिशय मजेदार होते. हेच चित्र विराट कोहलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये वापरण्यात आले आहे.
अनिल कपूर यांनी हा मिम दिग्दर्शक अनीस बज्मी यांना टॅग करुन मजेशीर कॅप्शनही दिले आहे. 'मजनू भाईचे हे चित्र खूप दुर आणि जगभर पसरत आहे', असे कॅप्शन देत त्यांनी हास्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.

नेटकरी या फोटोवर कोहिनूर हिऱ्याबाबतही मिम्स पोस्ट करत आहेत. विराटने इंग्लंडच्या बकिंगहॅम पॅलेसमधून कोहिनूर हिरा परत आणावा, अशा आशयाचे मिम्स तयार करुन व्हायरल केले जात आहेत.