मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'लगान' चित्रपटाला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. १५ जून २००१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला १८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आमिर खानने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
आमिर खानने 'लगान' चित्रपटाचा फोटो शेअर करून आशुतोष गोवारीकर आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'या चित्रपटाचा एक अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय प्रवास होता. आजही हा प्रवास तितकाच महत्वाचा आहे', असे त्याने या फोटोवर कॅप्शन दिले आहे.
'लगान' चित्रपटाची गाणी देखील कथेप्रमाणेच हिट झाली होती. या चित्रपटाची फार प्रशंसा झाली होती. आमिरची लोकप्रियता याच चित्रपटानंतर मोठ्या प्रमाणात वाढली. आता लवकरच तो 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटाची घोषणा केली आहे.