मराठी चित्रपट सातासमुद्रापार जाताना दिसतोय. मराठी सिनेमा आशयघनतेसाठी ओळखला जातो आणि त्यामुळेच तो अगणित राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समधून फिरत असतो. फ्रान्समधील ‘कान’ मध्ये दरवर्षी भरणारा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म्स फेस्टिवल्स मध्ये प्रतिष्ठित मानला जातो. फक्त गेल्यावर्षी यात खंड पडला कारण साहजिकच कोरोना आहे. परंतु यावर्षी आयोजकांनी नेटाने हा चित्रपट महोत्सव भरविला आहे. जगभरातून अनेक चित्रकर्मी येथे हजेरी लावून असले तरी भारतातील कोणालाही ‘व्हिजा’ न मिळाल्यामुळे फक्त चित्रपटचं पोहोचू शकले आहेत. एकंदरीत आपल्या १५ एन्ट्रीजमध्ये मराठी चित्रपट ‘फास’ याचा प्रीमियर नुकताच या महोत्सवात संपन्न झाला.
![101-award-winning-film-fas-premieres-at-cannes-film-festival](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-faas-premiers-cannes-film-festival-mhc10001_12072021012755_1207f_1626033475_757.jpeg)
अविनाश कोलते दिग्दर्शित ‘फास’ ला आतापर्यंत १०१ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये, आपल्या दमदार अभिनयाने विविध पुरस्कार पटकावणारे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच अभिनयाचे शाश्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या कमलेश सावंत याने पिचलेल्या आणि हताश शेतकऱ्याच्या भूमिकेत जान ओतली आहे. नावावरून कल्पना आलीच असेल की हा चित्रपट शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर प्रखर भाष्य करणारा आहे. लेखिका माहेश्वरी पाटील यांनी स्वानुभवावरून आणि वास्तविक घटनांवर आधारित कथानक लिहिले असून त्याचे हृदयद्रावक चित्रण झाले आहे.
![-fas-premieres-at-cannes-film-festival](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-faas-premiers-cannes-film-festival-mhc10001_12072021012755_1207f_1626033475_1029.jpeg)
‘खरंतर पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत चर्चा करणे यासारखा विरोधाभास नाही. माझ्यामते हा प्रश्न योग्य लोकांपर्यत पोहोचणे गरजेचे आहे’, असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी मांडले. ते स्वतः पर्यावरणवादी प्रश्नांवर तन्मयतेने आणि कुठलाही गाजावाजा न करता काम करीत असतात तसेच झाडांना वाचावा हे कळकळीने सांगत असतात. अभिनेते उपेंद्र लिमये म्हणाले, ‘मी नेहमीच आशयघन चित्रपटांना पसंती देतो तसेच पदर्पणीय दिग्दर्शकांसोबत काम करायला कचरत नाही. नवीन दिग्दर्शक नेहमीच पोटतिडकीने आपली कथा मांडत असतो जशी अविनाशने ‘फास’ मधून मंडळी आहे. मी नेहमीच सामाजिक व राजकीय विषयांवरील चित्रपटांमध्ये काम करण्यास प्राधान्य देतो. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचला पाहिजे आणि समाजाला जाणिवेच्या पातळीवर आणून आपल्या अन्नदात्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.’
गेल्या काही वर्षांत देशभरात, आणि खासकरून महाराष्ट्रात, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले होते. ‘फास’ मधून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील तफावत अधोरेखित करण्यात आली असून शेतकऱ्यांचे वास्तविक प्रश्न अत्यंत गांभीर्याने हाताळले गेले आहेत. शेतकऱ्यांची खरी परिस्थिती काय आहे आणि कोणते बदल घडायला पाहिजेत म्हणजे हा बुडत चाललेला शेतकरी कुठेतरी डोके वर काढू शकेल यावर ‘फास’ हा चित्रपट उहापोह करतो. मराठी चित्रपट सातासमुद्रापार तर जातोय आणि ‘फास’ सारख्या आशयघन चित्रपटाचा प्रीमियर फ्रान्समध्ये संपन्न होतो ही अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु शेतकऱ्यांसोबतच मराठी चित्रपटाला जगविण्यासाठी सुद्धा उपाय होणे गरजेचे आहे.
हेही वाचा - ''मराठा सिर्फ दो ही बात जानता है...मारना या मरना'': ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ चा ट्रेलर रिलीज