मुंबई - यावर्षी आलेली कोरोना महामारीची दुसरी लाट महाभयंकर रूप घेतेय. भारतामध्ये दररोज चार लाखांच्या घरात रुग्णसंख्या वाढतेय. केंद्र आणि राज्य सरकारे सर्वतोपरी त्याचा मुकाबला करताहेत परंतु हीच वेळ आहे सर्वांनी देशासाठी काही करण्याची. मनोरंजनसृष्टीतील अनेक मान्यवरांनी मदतीचा हात पुढे केला आहे. खेळजगतातील विराट कोहली आणि मनोरंजनविश्वातील अनुष्का शर्मा म्हणजेच सर्वांच्या लाडक्या विरुष्काने कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी २ कोटींची मदत देऊ केली आहे.
विरुष्का’ ची २ कोटींची मदत भारतीय क्रिकेट कप्तान विराट कोहली आणि त्याची सहचारिणी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कोविड -१९ च्या लढतीत २ कोटी रुपये दान केले आहेत. ते ‘क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म’ “केटो” च्या माध्यमातून पुढचे सात दिवस देणग्या मिळविणार असून जवळपास रु. ७ कोटी जमविण्याची त्यांची मनीषा आहे व ती ‘ऍक्ट ग्राण्टस’ च्या तर्फे ऑक्सिजन, वैद्यकीय मनुष्यबळ, लसीकरण जागरूकता आणि दूरध्वनी-औषध सुविधा देण्यासाठी वापरली जाणार आहे.
देशातील आरोग्य यंत्रणेने या प्रकरणातील बोजा सहन करण्यासाठी संघर्ष केला असल्याने लोकांचे हाल पाहणे खूप वेदनादायक असल्याचे अनुष्का म्हणाली. ‘आपण आपल्या देशाच्या इतिहासात एका अभूतपूर्व काळातून जात आहोत, जो कठीण आहे. माझा देश अशा परिस्थितीत बघून आम्हाला अतीव दुःख होत आहे. आमची काळजी घेणाऱ्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. या लढ्यात जे फ्रंटलाईनवर आहेत त्यांची स्तुती करावी तेव्हडी कमी आहे. परंतु आता त्यांना आपली गरज आहे आणि आपल्याला त्यांच्यासोबत उभे राहण्याची. म्हणूनच आम्ही, अनुष्का आणि विराट, केटो वर एक ‘फंड रेझर’ सुरु करीत असून ते पैसे ऍक्ट ग्राण्टसला जातील. आमची सर्वांना कळकळीची विनंती आहे की छोट्यातली छोटी का असेना पण मदत करा. आपल्या देशाला आपली गरज आहे. स्टे सेफ, जय हिंद’ अशा पद्धतीची पोस्ट विरुष्काने समाज माध्यमावर पोस्ट केलीय.