हिंदीमधील ‘कबीर सिंग’, जो तेलगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ वर आधारित होता, हिट झाला आणि शाहिद कपूरची भरपूर स्तुती झाली. परंतु अनेकांनी ‘ओरिजिनल’ कबीर सिंग म्हणजेच अर्जुन रेड्डीची भूमिका कोणी केली होती यात स्वारस्य दाखविले. ती भूमिका केली होती दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा याने. त्याची अभिनय-प्रतिभा पाहून करण जोहरने त्याच्यासोबत हिंदी चित्रपट करण्याचे ठरविले आणि धर्मा प्रॉडक्शन्सच्या ‘लायगर’ मधून विजय देवरकोंडा बॉलिवूड पदार्पण करतोय. चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे रोमान्स करताना दिसेल.
काही महिन्यांपूर्वी ‘लायगर’ चे पोस्टर रिलीज करण्यात आले होते आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. गेल्या ९ मे ला त्या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होणार होता. परंतु करण जोहर च्या धर्मा प्रॉडक्शन्स आणि विजय देवरकोंडा यांनी ते पुढे ढकलले. सध्या आपला देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यात होरपळून निघतोय. त्यामुळे अनेक राज्यांत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहे बंद करण्यात आली असून सर्व प्रकारच्या शूट्सना बंदी आहे. रोज लाखांनी नवीन कोरोना केसेस समोर येताहेत आणि मनोरंजनसृष्टीही कोरोनाच्या तडाख्यातून सुटलेली नाही. सगळीकडे नैराश्य पसरलेले असताना आम्हाला ‘लायगर’ चा टिझर प्रदर्शित करण्यात सोयीस्कर वाटत नाहीये असे चित्रपटाच्या निर्मात्यांनी एका निवेदनाद्वारे कळविले आहे.
“आपल्या देशात सध्याची परिस्थिती आणि वातावरणामुळे ‘लायगर’ च्या टिझरचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले असून सद्यपरिस्थिती निवळताच चांगल्या वातावरणात आम्ही ते प्रदर्शित करू. आम्हाला खात्री आहे की विजय देवरकोंडाचे हे बॉलिवूड पदार्पण धमाकेदार असेल आणि प्रेक्षकांची कदापि निराशा होणार नाही याची आम्ही ग्वाही देतो.
सर्वांनी घरीच बसा, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि आपल्या सर्व प्रियजनांची काळजी घ्या. लसीकरण करून घ्या आणि त्यात इतरांनाही मदत करा. शासकीय आणि वैद्यकीय सूचनांचं तंतोतंत पालन करा. आपण सर्वजण मिळून या कठीण प्रसंगावर मात करू शकतो हे लक्षात ठेवा. जेव्हा कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईल तेव्हा आपण भेटूच, चित्रपटगृहांत. आपले विश्वासू, विजय देवरकोंडा..धर्मा प्रॉडक्शन्स ..पुरी कनेक्ट्स “
थोडक्यात धर्मा प्रॉडक्शन्सच्या ‘लायगर’ च्या प्रोमोशन्सना कोरोना-ब्रेक लागला असून विजय देवरकोंडाचे बॉलिवूड पदार्पण लांबणीवर पडले आहे.
हेही वाचा - राजधानी दिल्लीत सर्व सुविधायुक्त १०० खाटांचे रुग्णालय बांधतेय हुमा कुरेशी!