मुंबई - सध्या रणवीर सिंग खूप चर्चेत आहे. गल्ली बॉयला मिळालेल्या यशानंतर तो कबीर खानच्या ८३ चित्रपटात काम करीत आहे. भारताने १९८३ मध्ये जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकाची कथा यात पाहायला मिळणार आहे. रणवीर कपील देव यांची भूमिका साकारत आहे.
१९८३ मध्ये कपील देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने क्रिकेटचा विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला होता. या चित्रपटात सुनिल गावसकर यांची भूमिका कोण साकारणार ही गोष्ट गुलदस्त्यात होती. ही भूमिका ताहिर राज भसीन साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ताहिर राज भसीन याने मर्दानी, फोर्स 2 आणि मंटो या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. ताहिर खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. परंतु मंटोतील त्याच्या भूमिकेने त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. या चित्रपटात काम करण्याआधी ताहिर सुनिल गावस्कर यांची भेट घेणार आहे.
सध्या ताहिर गावस्कर यांच्यासारखी बॅटींग शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. हे शिकून झाल्यानंतर तो गावस्कर यांना भेटणार आहे. तो या भेटीसाठी उतावीळ झाला आहे.