मुंबई - तापसी पन्नूचा सध्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत समावेश झाला आहे. तापसीनं अनेक कॉमेडी चित्रपटांतून प्रेक्षकांना खळखळून हसवलं तर अनेक चित्रपटांतून एखाद्या गंभीर सामाजिक विषयावर भाष्य करत आपल्या अभिनयाची ताकत दाखवून दिली. आज तापसीचा वाढदिवस, याच निमित्ताने जाणून घेऊ तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी
तापसीचा जन्म १ ऑगस्ट १९८७ ला दिल्लीतील एका शिख परिवारात झाला. शाळेत असताना तापसीला अभ्यासासोबतच खेळ आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रस होता. आठ वर्षाच्या वयातच तापसीनं डान्स शिकायला सुरूवात केली. चित्रपटसृष्टीत पाय ठेवण्याआधी ती सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. यानंतर काही काळातच तिने मॉडलिंगला सुरूवात केली. तिला मॉडेल बनायचं होतं. मात्र, नंतर ती अभिनेत्री झाली.
तिनं चित्रपटसृष्टीतील आपल्या करिअरची सुरूवात २०१० मध्ये आलेल्या 'झुम्मंदी नादम' या तेलुगू चित्रपटातून केली. तर तिच्या दुसऱ्या चित्रपटातून तिनं तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आदुकलम असं या चित्रपटाचं नाव होतं. या चित्रपटात तिच्या अपोझिट धनुष झळकला होता. हा चित्रपट हीट ठरला आणि चित्रपटासाठी तिला ६ नॅशनल अॅवॉर्ड मिळाले.
तापसीनं २०१३ मध्ये चश्मेबद्दूर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि तापसी चर्चेत आली. तर अमिताभ बच्चन यांच्या पिंक चित्रपटातील तिची भूमिका चांगलीच गाजली. दाक्षिणात्य राज्यांमध्ये तापसीचे अनेक चाहते आहेत. या गोष्टीचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो, की साल २०११ मध्ये तापसीनं एकामागोमाग ७ चित्रपटांत काम केलं. तापसीला हिंदी आणि इंग्रजीसह सहा भाषा येतात.