मुंबई - सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट लिहिल्याचा आरोप कंगना रणौतवर आहे. याबात सुरू असलेल्या तपासाचा प्रगती अहवाल न्यायालयाने मागितला आहे. मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने शुक्रवारी पोलिसांना तपास अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एका वकिलाच्या तक्रारीवरुन कोर्टाने कंगनाचा तपास करण्याचा आणि ५ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता.
पोलीस ठरलेल्या मुदतीत अहवाल दाखल करू शकले नाहीत. त्यानंतर कोर्टाने अंतिम मुदत ५ जानेवारीपर्यंत वाढविली. यानंतर कोर्टाने पुन्हा एकदा ५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली, परंतु अद्यापही पोलीस अहवाल सादर करण्यात अपयशी ठरले आहेत.
कंगना रणौतच्याविरोधात तक्रार दाखल करणारे वकील अली आसिफ खान देशमुख म्हणाले की, 'अनेक वेळा मुदत वाढवूनही पोलीस तक्रार नोंदविण्यात अपयशी ठरले आहेत. मी कोर्टाला आरोपीविरोधात थेट कारवाई करण्यास सांगितले होते. अशा परिस्थितीत पोलिसांकडे कोर्टाने आता तपासाचा प्रगती अहवाल मागितला आहे. सध्या सीआरपीसीच्या कलम २०२ अन्वये कंगना रणौतच्याविरूद्ध चौकशी सुरू आहे. त्याअंतर्गत कोर्टाने पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून कंगनाच्या विरोधात प्राथमिक प्रकरण दाखल आहे की नाही हे सांगावे असे आदेश दिले आहेत.
कोर्टाने पुढील सुनावणीसाठी ४ मार्चची मुदत दिली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कंगना रणौतची बहीण रांगोली चंदेल हिने एका समुदायाला लक्ष्य केले होते. त्यानंतर ट्विटरवर तिचे अकाउंटही निलंबित करण्यात आले होते.
कंगना रणौतने या पोस्टला पाठिंबा दर्शविणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये कंगनाने एका विशिष्ट समुदायाला दहशतवादी म्हटले आहे. याबाबत तक्रार देत असिफ खान देशमुख यांनी कोर्टाकडे मागणी केली होती की, पोलिसांनी दोघींविरोधात चौकशी करावी आणि कारवाई केली पाहिजे.
हेही वाचा - क्रिकेटची पार्श्वभूमी ल्यालेल्या ‘फ्री हिट दणका' मधून दिसणार ‘फॅन्ड्री’फेम सोमनाथ अवघडे!