मुंबई - अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. या अभिनेत्रींच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्याच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत चार इमारती सील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
अभिनेत्रींच्या संपर्कातील लोकांच्या कोरोना चाचण्या -
अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा या दोन अभिनेत्री चित्रपट निर्माते करण जोहर यांच्या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या पार्टीनंतर त्या दोघींची कोरोना चाचणी केली असता त्या दोघी कोरोना पॉजिटिव्ह आढळून आल्या आहेत. या दोन्ही अभिनेत्री पॉझिटिव्ह आल्यावर त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल उद्या येईल. दरम्यान पालिकेने या अभिनेत्री राहत असलेल्या इमारतींमध्ये कोरोना चाचण्या केल्या आहेत. त्याचाही अहवाल उद्या येणार आहे.
अभिनेत्रींनी केली होती पार्टी
दरम्यान करण जोहर यांचा कोरोना रिपोर्ट नेगटीव्ह आला आहे, तरीही सुरक्षेचे कारण म्हणून पालिकेने करण जोहर, करिना कपूर, अमृता अरोरा, सोहेल खान याची पत्नी सीमा खान राहत असलेल्या चार इमारती सील केल्या आहेत. करण जोहर यांनी आयोजित केलेल्या पार्टीला ८ ते १० जण त्या पार्टीत सहभागी होते, अशी माहिती पालिकेला देण्यात आली आहे. मात्र यापेक्षा अधिक जण या पार्टीला असल्याची शक्यता बीएमसीने व्यक्त केली असल्याने कडक कार्यवाही करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
या 4 इमारती सील -
सीमा खान (सोहेल खानची पत्नी) - किरण अपार्टमेंट
करीना कपूर- सद्गुरू शरण
करण जोहर - द रेसिडेन्सी
अमृता अरोरा - सरकार हेरिटेज