बिकानेर - आगामी 'भुज : प्राईड ऑफ इंडिया' या युध्दपटाच्या शूटींगसाठी अभिनेता संजय दत्त रविवारी संध्याकाळी बिकानेरला पोहोचला. बिकानेर आणि सूरतगड परिसरात २९ फेब्रुवारीपर्यंत शूटींग चालणार आहे.
संजय दत्त चार्टड विमाननाने बिकानेरला पोहोचला. त्याच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी, फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र विमानातून उतरताच संजय दत्तने कारमध्ये बसत हेरिटेज हॉटेल नरेंद्र भवनकडे प्रस्थान केल्यामुळे चाहते नाराज झाले.
'भुज : प्राईड ऑफ इंडिया' चित्रपटाचे शूटींग १७ ते २९ फेब्रुवारी या दरम्यान बिकानेर आणि सूरतगडमध्ये होणार आहे. यात भाग घेण्यासाठी अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा लवकरच पोहोचणार आहेत.
१९७१ च्या भारत पाक लढाईच्या पार्श्वभूमीवरचा हा चित्रपट आहे. भारताच्या रणनितीला फायदा व्हावा यासाठी गुजरातमधील कच्छ भागातील माधपार गावातील ३०० महिलांनी मोठी बहाद्दुरी दाखवली होती. त्याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. अभिषेक दुधैया याचे दिग्दर्शन करीत आहेत.
'भुज : प्राईड ऑफ इंडिया' हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १४ ऑगस्टला रिलीज होणार आहे.