पूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार सहसा प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम करीत नसत. प्रादेशिक चित्रपटांमध्ये एखादा कलाकार गेला म्हणजे त्याचे हिंदीतील ‘मार्केट’ संपले असे गृहीत धरले जाई. परंतु काळ बदलतोय आणि हिंदीतील मोठमोठी नावं सध्या दाक्षिणात्य चित्रपटांतून कामं करताहेत. ही हिंदी फिल्म इंडस्ट्रीची ऍडजस्टमेन्ट आहे असे म्हणू शकतो. कारण हिंदी चित्रपट साऊथ इंडियामध्ये बघितले जात नाहीत, जर का ते तामिळ किंवा तेलगू मध्ये डब केलेले नसतील. तसेच दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री सध्या प्रचंड कमाई करतेय आणि ते हिंदीवाल्यांच्या लक्षात आले आहेच. त्यामुळे सध्या हिंदीतील मोठा कलाकार दाक्षिणात्य चित्रपटात आणि साऊथचा मोठा स्टार हिंदी चित्रपटांत दिसू लागले आहेत. असो. महत्वाचं म्हणजे दाक्षिणात्य असो की हिंदी, ब्युटी क्वीन पूजा हेगडे, दोन्ही इंडस्ट्रीमध्ये लीलया वावरताना दिसतेय. नुकताच सलमान खानचा ‘राधे’ प्रदर्शित झाला ज्यातील ‘सिटी मार’ गाणे खूप गाजतंय. ते अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे च्या तेलगू ‘सिटी मार’ गाण्याचा रिमेक आहे आणि त्या दोघांचा भन्नाट डान्स हिंदी भाषिक प्रेक्षकांना प्रचंड आवडलेला आहे.
तर, पूजा हेगडे ही पॅन-इंडिया अभिनेत्री आहे असे म्हटले जात असून ती चक्क हिंदीसकट चार भाषांमधील चित्रपटांतून कामं करतेय. त्यामुळेच तिचा चाहतावर्ग ‘कश्मीर से कन्याकुमारी’ पर्यंत पसरलेला आहे. आताच्या पिढीतील अभिनेत्रींमध्ये ती एकमेव आहे जी सर्वच प्रमुख फिल्म इंडस्ट्रीत दिमाखात वावरत आहे. ती याबाबतीत ‘ट्रेंड सेटर’ ठरत असून अनेकजणी तिच्या पावलावर पाऊल ठेवू इच्छित आहेत. तिच्या खिशात ४ भाषांमधील ६ चित्रपट असून ती त्या-त्या फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार्ससोबत कामं करीत आहे.
ही प्रतिभाशाली अभिनेत्री तिच्या कलागुणांमुळे प्रत्येक चित्रपट उद्योगातील प्रमुख कलाकारांसोबत काम करताना दिसेल. इतक्या विविधांगी भाषांमधून कामं करतानाच्या आपल्या अनुभवाबद्दल सांगताना पूजा म्हणाली, ‘प्रत्येक चित्रपटातून नवीन अनुभव मिळतो, नवीन शिकायला मिळते, निरनिरळ्या संस्कृती समजण्यास मदत होते. अनेक भाषांमधील चित्रपट करणे नक्कीच आव्हानात्मक आहे आणि मला आव्हानं झेलायला आवडतात. अर्थात या प्रत्येक चित्रपटातून मनोरंजन करणे हा माझा प्रमुख हेतू असतो. हा अनुभव मला पूर्ण ‘भारतीय’ बनवितो.’
तिच्या बहुभाषिक चित्रपटांविषयी सांगायचं झालं तर पूजा हेगडे २ मोठ्या हिंदी चित्रपटांमध्ये काम करतेय. ती साजिद नाडियादवाला निर्मित चित्रपटामध्ये सलमान खान ची नायिका म्हणून दिसेल तर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ मध्ये ती रणवीर सिंगची हिरॉईन म्हणून काम करीत आहे. ‘सर्कस’ चे बरेचसे चित्रीकरण उरकले असून सलमानसोबतच्या तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. ‘बाहुबली’ फेम प्रभास सोबत पूजा हेगडे ‘राधे श्याम’ या रोमँटिक चित्रपटात काम करीत आहे. हा एक पिरियड ड्रामा असून ती प्रेरणा नामक भूमिकेत दिसणार आहे. हा एक बहुभाषिक चित्रपट असून पॅन-इंडिया चित्रपट म्हणविला जातोय.
अला वैकुंठापुरमुलु हे तेलगू चित्रपट उद्योगातील मोठमोठे ब्लॉकबर्स्टर देणारे नाव असून पूजा त्यांच्याच ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ या तेलगू चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती ’स्टॅन्ड अप कॉमेडियन’ चे पात्र रंगविणार असून हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. तसेच सुपरस्टार चिरंजीवी अभिनित, अभिनेता राम चरण समवेत ‘आचार्य’ या चित्रपटातही प्रमुख पूजा भूमिकेत दिसेल. पूजा तामिळ चित्रपटांतूनही कामं करते आणि ती आता ‘थलपथी ६५’ या चित्रपटात तामिळ सुपरस्टार थलपथी विजयची नायिका म्हणून दिसेल. या चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली असून लवकरच चित्रीकरणाला प्रारंभ होणार आहे.
अशी ही सुपर टॅलेंटेड सुस्वरूप अभिनेत्री पूजा हेगडे आगामी स्त्री-सुपरस्टार च्या घोडदौडीत नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास चित्रपटसृष्टीतील जाणकारांकडून व्यक्त केला जातोय.
हेही वाचा - Cyclone Tauktae LIVE Updates : तौक्तेची तीव्रता वाढली; मुंबईत लोकल वाहतूक ठप्प, विमान सेवेवरही परिणाम..