मुंबई - परिणीती चोप्राच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या अभिनयामुळे आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर थ्रिलर 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हिंदी रिमेक चर्चेत आहे. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हाच परिणीतीच्या अभिनयाबद्दल सर्व स्तरांवर बोलले गेले. आता परिणीतीने या चित्रपटातील भूमिकेसाठी कोणकोणत्या दिव्यातून जावे लागले, हे उघड केले आहे. तिने आपल्या खासगी आयुष्यातील वेदनादायक आठवणी वापरत ही भूमिका साकारली, असे तिने सांगितले.
‘द गर्ल ऑन द ट्रेन' मध्ये माझ्या कामासाठी मिळालेला प्रतिसाद मला खूप समाधान देत आहे. रक्त, घाम आणि अश्रू असे सगळे काही मी ही भूमिका जिवंत करण्यासाठी ओतले आहे. या भूमिकेसाठी माझ्या आयुष्यातील वेदनादायक आठवणी पुन्हा जगले. मी अनेकदा सेटवर रडले. माझ्या मनात अनेक वेदनादायक आठवणी दबलेल्या होत्या, त्यांना मी बाहेर आणत भावनांना वाट मोकळी करून दिली, असे परिणीतीने सांगितले.
एका प्रसिद्ध पुस्तकावरून बनलेल्या अभिनेत्री एमिली ब्लंटची मुख्य भूमिका असलेल्या हॉलिवूड चित्रपटाची हिंदी आवृत्ती म्हणजे ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ आहे. या आवृत्तीत परिणीती चोप्रा ही ट्रेनमधून प्रवास करणारी एक मद्यपी घटस्फोटितेची भूमिका साकारत आहे. जी एका हरवलेल्या व्यक्तीच्या तपासणीत नकळत सामील होते आणि त्यातून सखोल रहस्ये उघड होतात. ’द गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रिभू दासगुप्ता यांनी केले असून याचा नेटफ्लिक्सवर २६ फेब्रुवारी रोजी डिजिटल प्रीमियर होणार आहे.