मुंबई - ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने एक उत्तम कलाकार गमावला. त्यांच्या निधनाने सिनेजगतातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली. यानंतर आता अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
चिंटू हे माझे मित्र, सहकलाकार, दिग्दर्शक आणि शेजारी होते. माझं दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचं खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्यासारखं दुसरं कोणीच नाही, अशा शब्दांत मौसमी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ऋषी यांच्यासोबत काम केलेल्या दिवसांच्या आठवणी सांगताना मौसम म्हणाल्या, मी त्यांच्यासोबत केवळ सहकलाकार म्हणून काम केले नाही, तर त्यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांमध्येही काम केले. त्यांच्या आ अब लौट चले, चित्रपटातही भूमिका साकारली. एक दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ते सेटवर सर्वांची खूप काळजी घेत. एक अभिनेता असल्यामुळे त्यांना कलाकारांसमोर असणाऱ्या अडचणींची जाणीव होती.
पुढे त्या म्हणाल्या, आम्ही एकमेकांचे शेजारीही होतो. आमची शेवटची भेट माझी मुलगी पायलच्या निधनावेळी झाली होती. दरम्या पायलच्या लग्नालादेखील ते आल्याची आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. यालग्नाला आम्ही चित्रपटसृष्टीतील खूप ठराविक लोकांनाच आमंत्रण दिलं होते असे त्या म्हणाल्या.
ऋषी कपूर अमेरिकेतमध्ये उपचार घेत असताना त्यांच्यासोबत नियमित फोनवर बोलणे होत असे. इरफान खान आणि ऋषी कपूर दोघेही केवळ चांगले अभिनेतेच नव्हते, तर एक उत्तम व्यक्तीदेखील होते, असेही मौसमी यावेळी म्हणाल्या.