मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम मोदी' बायोपिक येत्या २४ मे'ला म्हणेजच लोकसभा निवडणुकांच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. अशात आता चित्रपटात मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरात या बायोपिकचे नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे येत्या २३ तारखेला लागणाऱया लोकसभा निवडणुकांच्या निकालाचाही संदर्भ या पोस्टरवर देण्यात आलेला आहे. 'आ रहे हैं दोबारा, अब कोई रोक नहीं सकता', असं वाक्य या पोस्टवर लिहिलं गेलं आहे. अनेक माध्यमांनी दिलेल्या एक्झिट पोलमुळे मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याच्या चर्चा सध्या नेटीझन्समध्ये सुरू आहेत. याच पार्श्भूमीवर पोस्टमध्ये या ओळींचा वापर केला गेला आहे.
दरम्यान मोदींच्या जीवनावर आधारित हा चित्रपट १२ एप्रिललाच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर चित्रपट प्रदर्शित झाल्यास हा आचारसंहितेचा भंग असेल असे म्हणत निवडणूक आयोगाने या चित्रपटाला स्थगिती दिली होती. आता निवडणूकीच्या निकालानंतर हा चित्रपट रिलीज केला जाईल.