मुंबई : बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर आपल्या दोन दशकाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच 'तख्त' या एका ऐतिहासिक विषयावरील चित्रपटाची निर्मिती करण्याचे स्वप्न उराशी बाळगून होता. त्याचा हा महत्वकांक्षी चित्रपट मात्र शुटिंग फ्लोअरवर पोहोचू शकलेला नाही. सध्या तरी त्याचे हे स्वप्न अपुरे राहिले आहे असेच म्हणावे लागेल.
तख्त हा एक ऐतिहासिक विषय असलेला चित्रपट आहे. औरंगजेब आणि त्याचा भाऊ दारा शुकोह यांच्यात सिंहासन मिळवण्यासाठी झालेल्या वैराची कथा यात दाखवण्यात येणार होती. या चित्रपटाचे प्री प्रॉडक्शनचे काम पूर्ण झाले होते. इतकेच नाही तर चित्रपटाचे कलाकारही निश्चित झाले आहेत. यात औरंगजेबची भूमिका विकी कौशल साकारणार होता तर दारा शुकोहच्या भूमिकेत रणवीर सिंगची निवड करण्यात आली होती. चित्रपटाच्या मल्टीस्टार कास्टमध्ये आलिया भट्ट, करिना कपूर, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूरसुद्धा होते.
करण जोहरचा हा महत्वकांक्षी चित्रपट अनेक कारणांनी लांबणीवर पडला आहे. याचे मुख्य कारण आहे याची भव्यता. 'तख्त'चे बजेट २५० कोटी ते ३०० कोटी ठरवण्यात आले होते. धर्मा प्रॉडक्शनने उघडपणे हा धोका स्वीकारण्याचे टाळले आहे. अलिकडे कोविड-१९मुळे सर्वच बॅनर्सना फटका बसला तसाच फटका धर्मा प्रॉडक्शनलाही बसला आहे.
करण जोहरच्या प्रॉडक्शनचे 'ब्रम्हास्त्र' आणि 'लायगर' हे प्रदर्शनाच्या मार्गावर असलेले महागडे चित्रपट असून 'शेरशाह', 'दोस्ताना २', 'जुग जुग जीयो' आणि शकुन बत्रा याचा आगामी चित्रपट असे मध्यम बजेट चित्रपट आहेत. अशावेळी 'तख्त'ची निर्मिती करणे हा निर्मात्यांसाठी एक जोखमीचा निर्णय असू शकतो. यामुळे धर्मा प्रॉडक्शनने पुढे न जण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - टायगरच्या आवाजातील ‘कॅसिनोवा’ गाणे रिलीज: चाहत्यांची भरभरुन पसंती