मुंबई - प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना रणौत विरोधात मुंबईतील अंधेरी न्यायालयामध्ये मानहानीचा दावा दाखल केला आहे. या संदर्भात कंगनाला आज चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स जुहू पोलिसांनी बजावले होते. मात्र, कंगना आज चौकशीसाठी हजर राहणार नाही. यासंदर्भात मुंबई पोलिसांना कळवण्यात आल्याचे कंगनाचे वकील रिझवान यांनी सांगितले.
नेमकं प्रकरणं काय?
प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रनौत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. कंगनाने विविध मुलाखतीत आपली बदनामी केली, असा दावा जावेद अख्तर यांनी केला. जावेद अख्तर यांनी अभिनेता ऋतिक रोशन याच्याविरोधात बोलू नये यासाठी दबाव टाकल्याचा आरोप कंगना रनौतने अनेक मुलाखतींमध्ये केला आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी कंगना रनौतला समन्स बजावले होते.
कंगना रणौत आणि वाद -
कंगनाच्या नेपोटिझमच्या मुद्द्यावरुन बराच वाद झाला. बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजी यावर तिने सतत टीका केली. त्यानंतर तिने महाराष्ट्र सरकारशीही पंगा घेतला. मुंबईची तुलना पीओकेशी करुन तिने नवा वाद ओढवून घेतला. तिच्या मुंबईच्या ऑफिसवर बीएमसीने हातोडा चालवल्यावर ती आणखीनच आक्रमक झाली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरीवर करण्यापर्यंत तिची मजल गेली. वर्ष अखेरीस तिने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही काही वादग्रस्त ट्विट केले होते.