मुंबई - खडकाळ जमिनीवर फुटलेला इवलासा अंकुर म्हणजे 'कागर'. हा अंकुर प्रेमाचा आहे की राजकीय क्षितीजावरचा ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला मकरंद माने दिग्दर्शित 'कागर' हा सिनेमा पाहायला हवा. सैराट या सिनेमाच्या यशाद्वारे अवघ्या महाराष्ट्रावर गारुड केलेल्या रिंकू राजगुरु हिचा हा दुसरा सिनेमा. त्यामुळे हा सिनेमा रिलीजपूर्वीच प्रचंड चर्चेत राहिला.
चित्रपटाची कथा -
विराईनगर हे आपल्या राज्यातील कोणत्याही तालुक्याचं ठिकाण शोभावं असं एक गाव. या गावात प्रस्तापित आमदार अप्पासाहेब (सुहास पळशीकर) आणि तरुण तडफदार नेता भैय्यासाहेब(शंतनू गँगणे ) यांच्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष. भैयासाहेब हे राजकारणात तसे नवखे त्यामुळे त्यांना आपल्या राजकीय तालमीत तयार करतात ते प्रभाकरराव देशमुख म्हणजेच गुरुजी. (शशांक शेंडे) या गुरुजींना बरीच वर्ष राजकारणाचा अनुभव आहे आणि त्यावर कधी एकदा आपली पकड मजबूत होते याची सुप्त महत्वाकांक्षाही आहे. याच गुरुजींचा पट्टशिष्य आणि सगळ्यात जवळचा कार्यकर्ता आहे युवराज म्हणजेच शुभंकर तावडे आणि त्यांची एकुलती एक मुलगी प्रियदर्शनी उर्फ राणी म्हणजेच रिंकू राजगुरु. सुरुवातीला गावातील राजकीय पट पालटत असतानाच अचानक युवराज आणि राणी एकमेकांच्या जवळ यायला लागतात. मात्र त्याचवेळी गुरुजी यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला युवराज स्वतःवर घेऊन त्यांच्या जास्तच जवळ येतो. एकीकडे युवराजची राजकीय कारकीर्द सुरु होणार असं वाटत असतानाच त्यांच्या नात्याची भनक गुरुजींना लागते आणि सिनेमाची खरी कथा सुरू होते. राणीचं आणि युवराजच प्रेम खरच यशस्वी होत का..? गुरुजींच्या राजकीय महत्वाकांशेत कुणाचा बळी जातो? साधी सरळ राणी थेट राजकारणाच्या पटवरची सगळ्यात महत्त्वाची राणी कशी बनते? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा सिनेमा पाहिल्यावरच मिळतील.
दिग्दर्शन -
मकरंद मानेचा 'कागर' हा सिनेमा काही तुकड्यात 'सैराट'चं एक्सटेन्शन वाटतो. या सिनेमाच्या प्रभावाखालून वेगळा विचार करणं अजूनही त्याला फारस जमलंय असं वाटत नाही. त्यात क्रेडिट द्यायचं तर नागराजच्या सिनेमाप्रमाणेच अकलूज आणि सोलापूर पट्ट्यातील अनेक सुंदर लोकेशन्स या सिनेमात आहेत. जी आपल्याला अक्षरशः त्यांच्या प्रेमात पाडतील. तर सिनेमाच दुसरं बलस्थान आहे ए.व्ही.प्रफुलचंद्र यांचं संगीत. सिनेमातील दोन गाणी निश्चितच वेगळी आणि श्रवणीय झाली आहेत. मकरंद माने राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक असल्याने कथेची योग्य जाण ठेवून त्यांनी समर्पकरित्या दिग्दर्शन केले आहे.
कलाकारांचे अभिनय -
आता बोलूयात अभिनयाबद्दल, सिनेमात सगळ्यात जास्त जर कुणाचं काम लक्षात रहात असेल तर ते म्हणजे शशांक शेंडे यांचं. धीरगंभीर,चलाख, धूर्त, कावेबाज, महत्वाकांक्षी राजकारणी आणि तितकाच कोमल बाप त्यांनी कमालीच्या ताकतीने साकारला आहे. शुभंकर तावडे याचा हा पहिलाच सिनेमा असला तरीही त्याने त्याचं नवखेपण जाणवून दिलेलं नाही. रिंकुला मात्र आता सिनेमागणिक अभिनयावर जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. 'सैराट'च्या तुलनेत 'कागर' या सिनेमात काही प्रसंगात ती जरा अवघडलेली दिसली. विशेष म्हणजे रोमँटिक सीन्स देताना तिचं हे अवघडलेपण जाणवल्याशिवाय रहात नाही.
प्रेम आणि राजकारणाच्या हिंदोळ्यावर झुलणारी कथा -
'कागर' या सिनेमाची कथा प्रेम आणि राजकारण अशा दोन्ही हिंदोळ्यावर एकाच वेळी झुलते, कधी राजकारण पुढे येतं तेव्हा प्रेमकहाणी मागे जाते आणि प्रेमकहाणी पुढे येते तेव्हा राजकारण मागे जातं. यातला समतोल राखता राखता लेखक दिग्दर्शकाची थोडीशी दमछाकच झालेली दिसते. त्यामुळे सिनेमा चांगला बनला असला तरीही तो परिपूर्णतेचा अनुभव देण्यात थोडा कमी पडतो. असं असलं तरीही अस्सल मातीतील कथा, चांगलं संगीत, आणि रिंकुचा कमबॅक या सिनेमाच्या दृष्टीने मजबूत बाबी आहेत. त्याच्या जीवावर 'कागर' हा समाधानकारकरित्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची 'घागर' नक्की भरेल अस वाटतंय.