मुंबई - अभिनेता सैफ अली खान लवकरच जॅकी भगनानीच्या पुजा एंटरटेन्मेंट या निर्मिती हाऊसद्वारे तयार होणाऱ्या 'जवानी जानेमन' चित्रपटात झळकणार आहे. तर सैफ अली खानची ब्लॅक नाईट फिल्मस आणि जय शेवाक्रामनी यांची नॉर्थन लाईट्स या कंपन्या चित्रपटाची सह निर्मिती करणार आहेत.
'जवानी जानेमन' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. या चित्रपटात सैफसोबत तब्बू स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या दोघांशिवाय चित्रपटात पुजा बेदी यांची मुलगी आलिया एफदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. नितीन कक्कर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे याबद्दलची माहिती दिली आहे.
नितीन कक्करद्वारा दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या जूनमध्ये सुरुवात होणार आहे. लंडनमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण केलं जाणार आहे. तब्बू आणि सैफच्या जोडीला एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक असणार आहेत. अशात आता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.