मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्याचे (Foreign Exchange Management Act) उल्लंघन केल्या प्रकरणी चौकशीसाठी ईडीने हे समन्स यामीला पाठविले आहे. अभिनेत्री यामीला हा दुसरा समन्स जारी करण्यात आला आहे. मुंबईतील ईडीच्या झोन २ च्या वतीने या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. यापूर्वीही मागील वर्षी यामीला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, परंतु कोविड साथीच्या आजारामुळे अभिनेत्री यामी गौतम जाऊ शकली नव्हती.
काय आहे प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, यामी गौतमला ईडीने ७ जुलैला हजर राहण्यास सांगितले आहे. खरं तर, यामीच्या वैयक्तिक बँक खात्यात परकीय चलनाचा व्यवहार होत होता, याबद्दल तिने अधिकाऱ्यांना सूचित केले नव्हते. काही व्यवहार पार पडल्यानंतर ती तपासाच्या कक्षात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण दीड कोटीचे आहे.
कोण आहे यामी गौतम
गेल्या महिन्यात यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धर याच्यासोबत हिमाचल प्रदेशमध्ये अगदी साध्या पद्धतीने लग्न केले होते. अभिनेत्री यामीने अचानक लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. लग्नानंतर यामीने सोशल मीडियावर शेअर केलेले अनेक फोटो चर्चेचा विषय ठरला होता.
यामी गौतमला फेअर अँड लवली या सौंदर्य उत्पादनाच्या जाहिरातीतून प्रसिद्धी मिळाली. त्यातूनच तिने बॉलिवूड चित्रपटांचा मार्ग निवडला. 'उरी', 'काबिल', 'सनम रे', 'गिन्नी वेड्स सनी', 'विकी डोनर', 'बाला', 'बदलापूर', 'टोटल सियापा' यासारख्या चित्रपटांमधून तिने भूमीका साकारली आहे.
कामाचा विचार करायचा तर ती 'भूत पोलीस', 'दसवी', 'ए थर्सडे' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटांमध्ये ती अर्जुन कपूर, सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिज, अभिषेक बच्चन आणि निरमत कौर या कलाकारांसोबत झळकणार आहे.
हेही वाचा - कार्यकर्त्याने जे केले ते प्रेमापोटी असेल, पण पडळकरांची भाषा फडणविसांना मान्य आहे का- रोहित पवारांचा सवाल