कोरोना महामारीने गेल्यावर्षी थैमान घातले होते. यावर्षी आलेली या विषाणूची दुसरी लाट पहिल्यापेक्षाही विखारी असून ती चौपट विषारी आहे असे जाणकार सांगतात. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे आणि सारे मनोरंजनविश्वही यात ढवळून निघाले आहे. चित्रपटगृहे तर बंद आहेतच परंतु महाराष्ट्रात शुटिंग्सनाही परवानगी नाहीये. तसेच अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ यांना कोरोनाची लागण होऊन गेली असून कोरोना पॉझिटिव्ह यादीत मोठमोठ्या कलाकारांची वर्णी लागली आहे. सूत्रांनुसार यात आता या यादीत दीपिका पदुकोणचे नाव सुद्धा आले असून संपूर्ण पदुकोण कुटुंबच कोरोनाच्या तडाख्यात सापडलंय.
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने चित्रपटसृष्टीची चक्क मोडतोड केली आहे. एकीकडे कलाकार मंडळी, पुन्हा एकदा, घरी बसली आहे, तर दुसरीकडे कुणी स्टार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना कोरोना विषाणूची लागण होत असल्याचे समोर येत आहे. नुकतीच बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
दीपिका पादुकोणची कोविड -१९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याचबरोबर तिचे वडील प्रकाश, तिची आई उज्वला, बहीण अनिशा ह्यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. पदुकोण फॅमिली बेंगळुरू मध्ये राहते आणि काही दिवसांपूर्वी दीपिका आपले यजमान रणवीर सिंग सोबत मुंबईहून बेंगळुरूला गेली होती. दहाएक दिवसांपूर्वी प्रकाश पदुकोण आणि त्यांची पत्नी उज्वला व मुलगी अनिशा यांना कोरोनासदृश लक्षणे असल्यासारखे भासले. त्यांनी लगेच कोरोना चाचणी करून घेतली आणि तिघांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. दीपिका, तिची आई व बहीण घरीच असून तिच्या वडिलांना मात्र इस्पितळात भरती करण्यात आलं आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे असे समजते.
दीपिका पादुकोण गेल्या वर्षीपासूनच कोरोना काळातही शूट्स करीत आली आहे. ती आणि रणवीर ‘८३’ मध्ये कपिल देव व त्यांची पत्नी रोमी देवची भूमिका साकारताना दिसणार आहेत. दीपिकाने शकुन बत्राच्या चित्रपटातील काम पूर्ण केले असून ‘पठाण’ मध्ये ती शाहरुख खानसोबत दिसणार आहे. दीपिका हृतिक रोशन सोबत ‘फायटर’ आणि अमिताभ बच्चन सोबत ‘द इंटर्न’ मध्ये काम करीत असून ती साऊथ मेगास्टार प्रभास सोबतही एक चित्रपट करीत आहे.
हेही वाचा - कुणाल कामराने व्हिडिओ पोस्ट करुन उडवली 'कंगना'ची खिल्ली