मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणी अटकेत असेलेल्या राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. त्याला आणखी चार दिवस पोलीस कोठडीत राहावे लागणार आहे. येत्या 27 जुलैपर्यंत राज कुंद्राला पोलीस कोठडी सुनावली आहे.
पॉर्न फिल्मचे शुटिंग करीत असल्याच्या गुन्ह्याखाली राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली आहे. तो पॉर्न व्हिडिओ बनवून अॅपवर अपलोड करीत असे, असा त्याच्यावर आरोप आहे. मंगळवारी त्याला न्यायालयाने 23 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. आज त्याला दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी राज कुंद्राच्या कोठडीत आणखी 7 दिवसांची वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.
पोर्नोग्राफीमधून मिळवलेले पैसे ऑनलाइन सट्टेबाजीसाठी वापरले जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या येस बँक खाते आणि युनायटेड बँक ऑफ आफ्रिका खात्यामधील व्यवहारांची चौकशी गरचेची असल्याचे मुंबई पोलिसांनी न्यायालयात सांगितले. यावर न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची म्हणजे 27 जुलैपर्यंत वाढ केली आहे.
राज कुंद्रा मास्टर माईंड -
राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी फिल्मच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तीचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या बहिणीच्या नवऱ्याची मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. या कंपनीचे सर्व कॉन्टेंटची निर्मिती, या अॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हट्सअप ग्रुप, इमेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत.
सोमवारी रात्री कुंद्राला अटक -
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी (दि. 19 जुलै) राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले होते. त्याच रात्री उशिरा राज कुंद्राला अटक करण्यात आली. त्याच्या अटकेच्या 10 तासानंतर नेरुळ परिसरातून रयान थारप याला या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
फेब्रुवारी 2021 मध्ये राज कुंद्रा विरोधात तक्रार दाखल -
राज कुंद्रा विरोधात फेब्रुवारी, 2019 मध्ये तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीमध्ये राज कुंद्रा अश्लील सिनेमे बनवत असून ते मोबाईल अॅपच्या माध्यमातून प्रसारित करत आहे, असे आरोप ठेवण्यात आले होते.
राज कुंद्राला सात वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा -
अश्लील सिनेमे तयार करुन मोबाईलच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा याच्यावर भा.दं.वि. चे कलम 292, 293, 420, 34 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट यू/एस 2(जी), 3, 4, 6, 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमान्वये गुन्हा सिद्ध झाल्यास राज कुंद्राला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती अॅड. नितीन धांडोरे यांनी दिली.