मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून बॉलिवूडसह जगभरातील चित्रपटांची शूटिंग बंद पडली होती. अनेक अटींसह गेल्या महिन्यात शूटिंगला सुरूवात झाली आहे. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे शूटिंग पूर्ववत झालेली नाहीत. अशा काळात संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग सुरू करुन ते पूर्ण करण्याचा अनोखा विक्रम अक्षय कुमारच्या बेल बॉटम या चित्रपटाने केला आहे. महामारीच्या काळात शूटिंग सुरू करणारा आणि पूर्ण करणारा जगातील पहिला चित्रपट ठरला आहे.
अक्षय कुमारने या यशाचे श्रेय आपल्या सर्व सहकाऱ्यांना दिले आहे. या यशाला त्याने "टीमवर्क" असे म्हटले आणि चित्रपटातील सर्व कलाकार आणि प्रत्येक क्रू मेंबर्सचे त्याने आभार मानले आहेत.
"हे टीमवर्क आहे. मी कास्ट आणि क्रूमधील सर्वांचे अगदी स्पॉट दादापासून ते लाईट दादापर्यंत, टेक्नीशियन्स ते मेकअप दादा ते अभिनेत्री वाणी, हुमा, माझे दिग्दर्शक रणजीत यांच्यापासून आमच्या प्रॉडक्शन टीमचे आभारी मानतो'', असे अक्षयने म्हटलंय.
आम्ही कल्पनाच करु शकत नव्हतो अशी काम करण्याची वेगळी पद्धत सर्वांनी समजावून दिली आहे. यामुळे जागतिक पातळीवरील चित्रपट व्यवसायाला नवी उभारी मिळेल आणि प्रेक्षकांचे मनोरंजन पुन्हा सुरू होईल. या काठिण काळीत शूट करताना याचा आधार मिळेल अशी अपेक्षा असल्याचेही अक्षयने म्हटले आहे.
बिग बजेट असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉलिवूड चित्रपटाच्या बरोबरीने बेल बॉटम या चित्रपटाचे शूटिंग कोरोना व्हायरसच्या या महामारीच्या काळात पार पडले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्या दीपशिखा, जॅकी भग्नानी, दिग्दर्शक रणजीत एम. तिवारी या सर्वांनी आपल्या सकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल आभार मानले आहेत.
या चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि लारा दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षयसोबत वाणीचा हा पहिला चित्रपट असेल. रणजीत तिवारी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाची निर्मिती निखील अडवाणी आणि वशू भगनानी करत आहेत.
असीम अरोरा आणि परवीज शेख यांनी लिहिलेला बेल बॉटम हा चित्रपट 2 एप्रिल 2021 रोजी रिलीज होणार आहे.