स्टॉकहोम - मानवी शरीराला तापमान आणि स्पर्शाची जाणीव करून देणाऱ्या चेतातंतूचा शोध लावणाऱ्या दोन अमेरिकन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे. डेव्हिड जुलियस आणि अर्डेम पॅटपौटीयन अशी या दोन शास्त्रज्ञांची नावे आहेत.
आपल्या अस्तित्वाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे संशोधन -
या दोघांनी सोमॅटोसेन्सेशन या क्षेत्रात सखोल संशोधन केले आहे. डोळे, कान आणि त्वचेसारख्या अवयवांना पाहणे, ऐकणे आणि स्पर्शाची अनुभूती देण्याच्या क्षमतेच्या अभ्यासास सोमॅटोसेन्सेशन असे म्हटले जाते. यामुळे निसर्गाची गुपिते खऱ्या अर्थाने उलगडल्याचे नोबेल समितीचे सरचिटणीस थॉमस पर्लमॅन म्हणाले. हे आपल्या अस्तित्वाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे हे संशोधन अधिक मौल्यवान असल्याचे ते म्हणाले.
'या' सेन्सरचा लावला शोध -
मिरचीमधील कॅप्सैसिन या घटकाचा वापर करून जुलियस यांनी त्वचेतील उष्णतेला प्रतिसाद देणारे नर्व्ह सेन्सरचा शोध लावला. तर पॅटपौटीयन यांनी यांत्रिक उत्तेजनाला प्रतिसाद देणारे पेशीतील स्वतंत्र दबाव-संवेदी सेन्सरचा शोध लावला. गतवर्षी या जोडगोळीला न्युरोसायन्समधील प्रतिष्ठित कावली पुरस्कारही मिळाला होता.
१९०१ मध्ये पहिला पुरस्कार -
नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनांसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक 'अल्फ्रेड नोबेल'ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले होते.
'असे' आहे पुरस्काराचे स्वरूप -
पुरस्कार स्वरुपात दोघांना सुवर्णपदक, पदवी आणि एक कोटी स्वीडिश क्रोनोर म्हणजेच सुमारे साडेआठ कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहेत. डायनामाईटचा शोध लावणारे स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथी दिवशी (१० डिसेंबर) स्टॉकहोममध्ये पाच विषयांतील नोबेल पारितोषिकांचे वितरण केले जाते. त्याच दिवशी नॉर्वेमध्ये सहाव्या शांततेच्या नोबेल पारितोषिकाचे वितरण केले जाते. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात येते. त्यानंतर डिसेंबरमध्ये पारितोषिक वितरण सोहळा पार पडतो.
हेही वाचा - नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांची खास मुलाखत