हैदराबाद : कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड होत असलेल्या बऱ्याच बातम्या आपण ऐकत आहोत. कर्नाटकातही एका वृद्ध महिलेच्या मृतदेहाला चक्क जेसीबीच्या सहाय्याने अंत्यविधीसाठी नेण्यात आल्याची घटना याच आठवड्यात घडली. मृत व्यक्तींच्या देहाची होत असलेली ही विटंबना म्हणजेच भारतीय संविधानाच्या कलम २१चे उल्लंघन आहे. हे कलम जीविताचे आणि वैयक्तिक स्वातंत्र्याची हमी या कलमांतर्गत देण्यात येते.
या कलमामध्ये उल्लेख केलेले हक्क, हे एखाद्या व्यक्तीला ती जिवंत असेपर्यंतच नाही तर ती गेल्यानंतरही लागू होतात हे विशेष! परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. व्यक्तीचा सन्मान आणि योग्य वागणुकीचा हक्क हा ती व्यक्ती मेल्यानंतर तिच्या मृतदेहालाही लागू होतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीच्या मृतदेहाचे त्या व्यक्तीच्या धार्मिक पार्श्वभूमीप्रमाणे अंत्यसंस्कार करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.
मृत व्यक्तींचे अधिकार आपल्या कायद्यामध्येच दिले आहेत -
- भारतीय दंड संहिता सेक्शन २९७ - दफनभूमीवर अतिक्रमण इत्यादी :
जो कोणी, एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने, किंवा एखाद्या व्यक्तीच्या धर्माची निंदा करण्याच्या उद्देशाने, किंवा हे माहिती असून की एखाद्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातील किंवा एखाद्या धर्माची निंदा होईल हे माहित असताना कोणतेही पूजास्थळ वा अंत्यभूमी किंवा दफनभूमी किंवा मृतदेह ठेवण्यासाठी वा अंत्यसंस्कार करण्यासाठी राखून ठेवलेल्या जागेवर अतिक्रमण करेल, वा त्याचा अनादर करेल; किंवा मानवी मृतदेहाची विटंबना करेल वा अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या व्यक्तींना त्रास देईल, त्या व्यक्तीला जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत कैद, किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा करण्यात येतील.
आंतरराष्ट्रीय करार आणि कायदे -
- जिनिव्हा कन्व्हेंशन,१९४९ - कलम १६.
युद्धामध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक पक्षाने, बळी गेलेल्या व्यक्तींना चुकीची वागणूक मिळून नये, यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.
- ऑस्ट्रेलियाच्या डिफेन्स फोर्सचे परिपत्रक, १९९४.
जरी ते सैनिकांचे, महत्त्वाच्या व्यक्तींचे वा सामान्य नागरिकांचे मृतदेह असतील, त्यांच्या मृतदेहांचा आदर हा केलाच गेला पाहिजे. त्यांचा सन्मान, कौटुंबीक हक्क, धार्मिक श्रद्धा आणि प्रथा तसेच परंपरा याचाही मान राखला गेला पाहिजे.
- युनायटेड किंगडम लष्करी परिपत्रक, १९५८.
"मृतदेहांचा अपमान होण्यापासून संरक्षण केले गेले पाहिजे."
- मानवी हक्कांसाठी असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आयोगाचा ठराव, २००५.
या ठरावामध्ये मानवी मृतदेहांची हाताळणी करणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन आणि विनियोग करणे यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच, मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या गरजांकडे लक्ष देण्याची गरजही अधोरेखित केली गेली आहे.
हेही वाचा : पतंजली कोरोनिल औषध बाजारात विकू शकते, पण...