हैदराबाद : हवेच्या प्रदूषणापासून वाचण्यासाठी आपण कित्येक गोष्टी करतो. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे वा रुमाल बांधणे असे प्रकार आपण सर्वांनीच केले आहेत. कित्येक वेळा एखाद्या रस्त्यावर जास्त प्रदूषण असते, म्हणून आपण दुसऱ्या लांबच्या रस्त्यानेही प्रवास करण्याचा पर्याय निवडतो. मात्र, घरात असताना आपण ही सर्व काळजी बाळगतो का? हवेच्या प्रदूषणाचा धोका आहे, म्हणून कधी घरात मास्क घालून बसलाय तुम्ही? नाही ना? कारण आपल्या घरातील हवा प्रदूषित नाही असा आपला समज (किंवा गैरसमज) असतो. मात्र, जगातील सुमारे ३०० कोटींहून अधिक लोकांच्या घरातील हवाही, तितकीच असुरक्षित आहे जितकी बाहेरची. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या एका संशोधन अहवालात ही बाब समोर आली आहे.
मॅथ्यू शप्लर हे ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ आणि लिव्हरपूर विद्यापीठ याठिकाणी पोस्ट-डॉक्टरेट संशोधन करतात. त्यांनी केलेल्या संशोधनामध्ये असे समोर आले आहे; की जेवढा धोका बाहेर वाहनांतून उत्सर्जित होणाऱ्या धुरामुळे आपल्याला असतो; तेवढाच धोका आपल्याला घरात कोळसा, रॉकेल किंवा गोवऱ्या जाळल्यामुळे होणाऱ्या धुराचाही असतो.
ब्लॅक कार्बन आणि जागतिक तापमानवाढ..
संशोधनाअंती सिद्ध झालं आहे, की या धुरामध्येही ब्लॅक कार्बनचे प्रमाण अधिक असते. या ब्लॅक कार्बनमधील कण हे सूर्यापासून येणारी अतीनील किरणे आपल्यामध्ये शोषूण घेतात. यामुळे या कणांचे, आणि पर्यायाने ते कण जिथे आहेत तिथले - म्हणजेच पृथ्वीचे तापमानही वाढते. याचाच परिणाम आपल्याला जागतिक तापमानवाढीच्या रुपाने दिसून येतो.
आपल्यावर काय परिणाम?
ब्लॅक कार्बन हा पीएम २.५ या घटकाचा एक भाग आहे. पीएम२.५ हा घटक २.५ मायक्रोमीटरहून अधिक लहान असतो. त्यामुळे तो श्वासातून सहजपणे आपल्या शरीरात जाऊ शकतो. या कणांमुळे हृदय, फुफ्फुस यांवर परिणाम होतो. यामुळे, दम्याची लक्षणेही जाणवू लागतात. तसेच, अधिक प्रमाणात हे कण शरीरात गेले असल्यास, हृदयविकार, न्यूमोनिया आणि फुफ्फुसांचा कर्करोग असे गंभीर आजार देखील होऊ शकतात.
आपले घर कितपत सुरक्षित?
आपल्या घरामध्ये किती प्रमाणात पीएम२.५ कण असणे सुरक्षित आहे, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक मर्यादा ठरवलेली आहे. मॅथ्यू यांनी या संशोधनासाठी चिली, चीन, कोलंबिया, भारत, पाकिस्तान, टांझानिया आणि झिंबॉम्ब्वेमधील घरांचे सर्वेक्षण केले. या संशोधनामध्ये त्यांना असे दिसून आले, की ज्या घरांमध्ये गॅस शेगडी, किंवा इलेक्ट्रिक शेगडीचा वापर स्वयंपाकासाठी होतो, त्या घरांमध्ये स्वयंपाकासाठी लाकडाचे सरपण वापरणाऱ्या घरांपेक्षा ५० टक्के कमी प्रमाणात पीएम२.५ कण आढळून आले. विशेष म्हणजे, गोवऱ्यांचा स्वयंपाकासाठी वापर करणाऱ्या घरांपेक्षा, गॅस-इलेक्ट्रिक शेगडीवाल्या घरांमध्ये हे प्रमाण ७५ टक्क्यांनी कमी होते.
मात्र तरीही, गॅस शेगडी किंवा इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करणाऱ्या ६० टक्के घरांमध्ये पीएम२.५ चे असलेले प्रमाणदेखील, जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या प्रमाणाहून अधिकच होते. याचाच अर्थ बाहेरच्या हवेतील प्रदूषण या घरांमध्ये जाऊन, आतील हवादेखील प्रदूषित करत होते. त्यामुळे, केवळ स्वयंपाकासाठीचे इंधन बदलून नाही, तर एकूणच हवा प्रदूषण कमी कसे करता येईल, यादृष्टीने सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.
हेही वाचा : 16 महिन्यांच्या मुलीच्या नाकाद्वारे काढला ब्रेन ट्यूमर