टेक डेस्क - ई-सुविधा देणाऱ्या सर्वच प्राधिकृत संस्था सातत्याने पासवर्डसंबंधी खबरदारी घेण्याचे आवाहन करत असतात. मात्र, नुकताच एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यावरुन हे स्पष्ट होत आहे की, युजर्स या सूचनांकडे सपशेल दुर्लक्ष करत आहेत. सगळ्यात कॉमन आणि अत्यंत सहजतेने हॅक करता येतील, अशा पासवर्ड्सची यादी पासवर्ड मॅनेजर सोल्यूशन देणारी फर्म 'NordPass' ने जारी केली आहे. या फर्मने दिलेल्या माहितीनुसार ‘१२३४५६' हा सन-२०२० मध्ये सर्वाधिक वापरण्यात आलेला पासवर्ड आहे. धक्कादायक म्हणजे, या पासवर्डला २३ मिलियनहून (२.३ कोटी) अधिकवेळा हॅक करण्यात आले आहे, अशी माहिती Nordpass ने आपल्या वार्षिक रिपोर्टमध्ये दिलेली आहे.
'Nordpass' कडून २०० सर्वात खराब पासवर्ड्सची यादी जारी
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, '१२३४५६' या पासवर्डचा वापर लक्षावधी लोकांकडून करण्यात येत आहे. केवळ एका सेकंदात किंवा त्याहूनही कमी वेळात हा पासवर्ड हॅक करता येऊ शकतो. यादीत '१२३४५६' हा पासवर्ड पहिल्या क्रमांकावर आहे. ‘१२३४५६७८९' दुसऱ्या स्थानावर असून 'picture१' ने तिसरे स्थान पटकावले आहे.
'Nordpass' ने प्रसिद्ध केलेल्या या अहवालातून एक गोष्ट प्रखरपणे स्पष्ट होत आहे की, यूजर्स आजही लक्षात ठेवायला सहजसोपे असणारे पासवर्ड वापरतात. हॅकर्स असे पासवर्ड अवघ्या काही सेकंदात हॅक करू शकतात. कंपन्या वारंवार पासवर्डसंबंधी सूचना जारी करतात. मात्र या यादीतून स्पष्ट होत आहे की, या सूचनांकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत आहे. काही क्षणात आपल्या कष्टाची कमाई एका खात्यातून दुसऱ्या खात्यात हॅकर्स वळवू शकतात. त्यामुळे यूजर्सला याबाबतीत दक्ष राहणे अत्यंत गरजेचे आहे.
ई-बँकिंग, ई-कामर्स साईट्स, सोशल साईट्स अकाउंट्स, एटीएम, डिजिटल सर्व्हिस प्लॅटफार्म (फोन पे, पेटीएम, गुगल पे यासह आदी) यांचे पासवर्ड काळजीपूर्वक सेट करा. सहज अंदाज लावता येईल, असे पासवर्ड ठेवणे टाळा. पासवर्ड सेट करताना त्यामध्ये अप्पर केस (कॅपिटल लेटर उदा : Q,A,S,D), लोअर केस (स्मॉल लेटर उदा : j,e,p,u), अंक (उदा : १, ५, ८, ३ ), स्पेशल कॅरेक्टर (उदा : !, &, %, *, $) या सर्वांचा समावेश करुन स्ट्रॉग पासवर्ड तयार करा. या उपाययोजनांमुळे तुम्ही सायबर हल्ल्याला बळी पडणार नाही. सोपे पासवर्ड ठेवल्यास हॅकर्स तुम्हाला सहज गंडा घालू शकतात.
'टॉप २०' पासवर्ड जे एका सेकंदाहूनही कमी वेळात होतात हॅक
१२३४५६ |
१२३४५६७८९ |
picture१ |
password |
१२३४५६७८ |
११११११ |
१२३१२३ |
१२३४५ |
१२३४५६७८९० |
senha |
१२३४५६७ |
qwerty |
abc१२३ |
Million२ |
०००००० |
१२३४ |
iloveyou |
aaron४३१ |
password१ |
qqww११२२ |