अबुजा : नायजेरियातील नायजर नदीत वऱ्हाडाची बोट उलटून 103 जणांचा मृत्यू झाला आहे. नायजेरियातील क्वारा राज्याच्या कपाडा, पाटीगी जिल्ह्यात हा अपघात झाला. बोटीत बसलेले बहुतेक नागरिक एका लग्नासाठी आलेले वऱ्हाडी असल्याचे सांगितले जात आहे. मुसळधार पावसामुळे रस्ता बंद झाल्याने हे वऱ्हाडी गावात अडकले होते. या बोटीमध्ये सुमारे 300 लोक होते. ही बोट झाडाच्या खोडावर आदळल्याने हा अपघात झाला. सोमवारी पहाटे हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
पावसामुळे रस्ता झाला होता बंद : नायजेरियाच्या उत्तर-मध्य क्वारा राज्याच्या कपाडा, पाटीगी जिल्ह्यात हा अपघात झाला. मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसापासून रस्ता बंद असल्याने नागरिक ये-जा करण्यासाठी होडीचा आधार घेत आहेत. लग्न समारंभात अडकलेले काही पाहुणे नायजर राज्यातील एग्बोटी गावातून नदी ओलांडत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेली बोट मोठी होती. लग्न समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांसह जवळपास 300 जण या बोटीत होते. या बोटीत विविध समाजातील स्त्री-पुरुषांचा सहभाग होता.
झाडाला आदळल्याने बोट तुटली : सोमवारी पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान हे वऱ्हाडी निघाले होते. निघाल्यानंतर काही वेळातच बोट पाण्यात वाहून गेलेल्या झाडावर आदळली. या धडकेमुळे बोटीचे दोन तुकडे झाले. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बोटीतील प्रवासीही वाहू लागले. बोटीतील नागरिकांमधून फक्त 53 जणांनाच वाचवता आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. याशिवाय 103 जणांचे मृतदेह सापडले असून बाकीचे बेपत्ता आहेत.
देखरेखीसाठी पथक घटनास्थळी दाखल : क्वारा येथील पोलीस कमांडचे प्रवक्ते अजय ओकासनमी यांनी घटनेचा आढावा घेण्यासाठी एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. या अपघातातून तब्बल 100 जणांना वाचवण्यात यश आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. क्वारा राज्य सरकारने पीडितांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. सरकारचे प्रवक्ते रफीउ अझकाये यांनी बचावलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी सुरू असलेल्या बचाव कार्यावर लक्ष ठेवून असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. याआधी मे महिन्यात नायजेरियातील सोकोटो येथे बोट उलटून 15 जणांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा -