नवी दिल्ली - इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, यासाठी संयुक्त राष्ट्र प्रयत्न करत आहेत. पॅलेस्टाईनमधील नागरिकांच्या हक्कांसाठी काम करणारे, संयुक्त राष्ट्रांचे एक प्रतिनिधीमंडळ सोमवारपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहे.
या प्रतिनिधी मंडळात, संयुक्त राष्ट्रांचे राजदूत, आणि सेनेगाल राष्ट्राचे प्रतिनिधी (समितीचे प्रमुख), इंडोनेशिया आणि मलेशियाचे प्रतिनिधी (समितीचे सदस्य), आणि पॅलेस्टाईन देशाचे प्रतिनिधी (समिती निरिक्षक) यांचा समावेश आहे.
एका अधिकृत निवेदनानुसार, या समितीचे कार्य हे पॅलेस्टाईन आणि इस्त्राईल या दोन्ही देशांशी चांगले संबंध असणाऱ्या देशाला, म्हणजेच भारताला या दोन्ही देशांमधील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करण्यास विनंती करणे हे आहे. याप्रकरणी शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी, भारताची राजकीय आणि मुत्सद्दी मदत करण्यावर संयुक्त राष्ट्रे लक्ष घालतील.
यासाठी संयुक्त राष्ट्रांची ही समिती, देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, आणि मंत्रालयातील वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहे.
हेही वाचा : कोरोना विषाणू : देशात आढळले दोन नवीन रुग्ण..