लंडन - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. युरोपात दहा लाखांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. इटली, फ्रान्स, स्पेन, इंग्लड, जर्मनी या देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. दरम्यान, इंग्लडने तीन आठवड्यांनी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंडमध्ये आत्तापर्यंत 1 लाख 3 हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 13 हजार 729 जणांचा मृत्यू झाला आहे. इंग्लंडमधील कोरोना संकटही गंभीर होताना दिसत आहे. एकूण रुग्णांधील 89 हजार अॅक्टिव्ह केसेस आहेत. इंग्लंडमध्ये आज दिवसभरातही 4 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांना नुकतेच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
जगभरात आत्तापर्यंत कोरोनाचे 21 लाख 19 हजार रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 लाख 41 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील रुग्णांचा आकडा साडेसहा लाखांच्या पुढे गेला आहे. तर स्पेन, इटली, फ्रान्स या देशांमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.