लंडन : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे आधीच एक विकसीत रुप पसरले असताना, आणखी एक वेगळ्या प्रकारचा कोरोना विषाणू समोर आला आहे. साऊथ आफ्रिकेशी संबंधित असलेल्या काही रुग्णांमध्ये हा तिसऱ्या प्रकारचा कोरोना विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू आधीच्या कोरोनापेक्षाही अधिक संसर्गजन्य असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.
कोरोनाचे दुसरे विकसीत रुप..
"ब्रिटनमध्ये दोन कोरोना रुग्णांमध्ये हा नव्या प्रकारचा विषाणू आढळून आला आहे. हे दोघेही काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात येऊन कोरोना बाधित झाले होते" असे हॅनकॉक यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. ब्रिटनमध्ये आधीपासूनच कोरोना विषाणूचे विकसीत रुप थैमान घालत आहे, त्यात आता आणखी एक नवे रुप समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नवा विषाणू अधिक धोकादायक..
हा तिसऱ्या प्रकारचा कोरोना विषाणू अधिक धोकादायक आहे, कारण हा पहिल्या दोन्ही प्रकारच्या कोरोनापेक्षा वेगाने पसरतो. या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेहून आलेले लोक, त्यांच्या संपर्कात असलेले लोक आणि या नव्या विषाणूची लागण झालेल्या लोकांच्या संपर्कात असलेले लोक अशा सर्वांना तातडीने विलगीकरणात ठेवण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत, असे हॅनकॉक यांनी सांगितले.
ब्रिटनमध्ये एकाच दिवसात आढळले ४० हजार रुग्ण..
२६ डिसेंबरपासून दक्षिण इंग्लंडच्या काही भागातील निर्बंधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ही खबरदारी बाळगण्यात येत आहे. या नव्या प्रकारच्या विषाणूमुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. एकट्या बुधवारी ब्रिटनमध्ये ४० हजार नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ७४४ कोरोना मृत्यूंची नोंद करण्यात आली. एप्रिलनंतरची ही सर्वोच्च संख्या आहे.
हेही वाचा : ब्रिटनमधून मुंबईत आले १६८८ प्रवासी; एकही पॉझिटिव्ह नाही