वॉशिंग्टन - क्रिस्टीना कोच या अंतराळवीरांगणेने नवा विश्वविक्रम रचला आहे. आंततराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर तब्बल अकरा महिने राहून, ती सर्वाधिक काळ अवकाशात राहणारी महिला ठरली आहे. ३२८ दिवस अंतराळात राहिल्यानंतर काल (गुरूवार) ती पृथ्वीवर परतली.
फ्लाईट इंजिनिअर क्रिस्टीना कोच हिच्यासह, रॉस्कोमॉस कंपनीचे सोयूज कमांडर अॅलेक्सँडर स्क्वोर्टसोव्ह, आणि युरोपियन अवकाश संस्थेचे लुका पार्मितानो यांना घेऊन रशियन सोयूज अवकाशयान हे गुरूवारी दुपारी २.४२ च्या सुमारास (भारतीय प्रमाणवेळेनुसार) कझाकस्तानमध्ये उतरले.
डिसेंबर महिन्यातच कोचने सर्वाधिक काळ अवकाशात राहणारी महिला अंतराळवीर होण्याचा मान पटकावला होता. याआधी हा मान 'नासा'च्या पेगी व्हिट्सन या अंतराळवीरांगणेकडे होता. २०१६-१७ मध्ये तिने २८८ दिवस अंतराळात वास्तव्य केले होते. तर, आतापर्यंत सर्वाधिक काळ अवकाशात राहिलेला अंतराळवीर स्कॉट केली याचा विक्रम मोडण्यासाठी कोचला अवघे १२ दिवस कमी पडले.
"अवकाशात इतके दिवस रहायला मिळणे हे खरोखरच सन्मानजनक आहे. पेगी ही माझा आदर्श आहे. माझ्या संपूर्ण प्रवासात तिने वेळोवेळी मला मार्गदर्शनही केले आहे. यावरून मलाही जाणीव होते आहे, की परतल्यानंतर आता पुढील अंतराळवीरांना मार्गदर्शन करणे ही माझी जबाबदारी आहे." असे मत कोचने डिसेंबरमध्ये पेगीचा विक्रम मोडल्यानंतर व्यक्त केले होते.
१४ मार्च २०१९ला अंतराळस्थानकावर पोहोचलेली क्रिस्टीना ही नासाच्या इतर मोहीमांप्रमाणेच सहा महिन्यांसाठी अंतराळात वास्तव्य करणार होती. मात्र, दीर्घकालीन अंतराळयात्रांच्या होणाऱ्या प्रभावाबाबत अधिक माहिती जाणून घेण्याच्या उद्देशाने नासाने तिचा मुक्काम वाढवला होता.
या एकूण मुक्कामात, क्रिस्टीनाने पृथ्वीच्या एकूण ५,२४८ प्रदक्षिणा घातल्या. यांची एकूण लांबी ही १३९ दशलक्ष मैल होते, जी की पृथ्वीपासून चंद्रापर्यंत २९१ फेऱ्या मारण्याइतकी आहे. या अकरा महिन्यांमध्ये तिने सहा वेळा 'स्पेसवॉक' केला. यामध्ये एकूण ४२ तास १५ मिनिटे ती अंतराळ स्थानकाच्या बाहेर होती. यादरम्यान अंतराळस्थानकाला भेट देणाऱ्या एक डझनहून अधिक वाहनांच्या लँडिंग आणि प्रक्षेपणाची ती साक्षीदार ठरली.
ती जिवंत आहे! -
"पृथ्वी ही अवकाशात फिरणारा केवळ एक गोळा नसून, ती जिवंत आहे! मी तिची ताकद आणि सौंदर्य हे तिच्या पृष्ठभागापासून २५० मैल दूर असणाऱ्या एका विशिष्ट ठिकाणाहून पाहिले आहे.", असे उद्गार कोचने काढले. गेल्या २० वर्षांपासून मानवाचे अवकाशात कायम वास्तव्य राहिले आहे. पृथ्वीवर परत आल्यानंतर, मी विचार करते आहे की अंतराळ स्थानकावर असलेले माझे मित्र आणि सहकारी आता माझ्याशिवाय काय करत असतील.", असे ती म्हटली.
हेही वाचा : कोरोनाविषयी सर्वात अगोदर माहिती देणाऱ्या डॉक्टरचाच कोरोनाने मृत्यू