लंडन - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जोडीदार कॅरी सायमंड्स यांनी बुधवारी लंडनच्या हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन पाचव्यांदा बाबा झाले असून त्यांनी आपल्या मुलाचे खास नाव ठेवले आहे. बोरीस आणि कॅरी यांचे आजोबा आणि कोरोनाविषाणूपासून बोरीस यांचा जीव वाचवणारे डॉक्टर अशा 4 व्यक्तींचे नाव मिळून त्यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले आहे.
'विल्फ्रेड लॉरी निकोलस जॉन्सन असे मुलाचे नाव ठेवण्यात आले आहे. यात नावामध्ये विशेष म्हणजे, बोरिस जॉन्सन यांचा जीव वाचवलेल्या डॉक्टरांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले आहे. यामध्ये 'विल्फ्रेड' हे बोरीस यांच्या आजोबांचे आहे. तर 'लॉरी' हे कॅरी सायमंड्स यांच्या आजोबांचे तर निकोलस हे बोरीस यांचा कोरोना विषाणूपासून जीव वाचवलेले 'डॉ. निक प्राइस आणि डॉ. निक हार्ट' यांच्या नावावरून ठेवले आहे. याबाबत कॅरी सायमंड्स यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
बोरिस जॉन्सन याआधी दोनवेळा विवाहबद्ध झाले आहेत. दुसरी पत्नी मरिना व्हीलर यांच्यापासून त्यांना चार मुले आहेत. मात्र व्हीलर आणि बोरिस जॉन्सन 2018 मध्ये विभक्त झाले. तर 2019 पासून बोरीस जॉन्सन कॅरी सायमंड्स यांना डेट करत होते. गेल्या वर्षी त्यांनी साखरपुडा केला आहे. कॅरी या पर्यावरणवादी कार्यकर्त्या आहेत आणि त्या ब्रिटनच नाही तर अनेक देशांतील पर्यावरणीय प्रकल्पांवर काम करत आहे.
दरम्यान नुकतच बोरिस जॉन्सन (55) हे कोरोना विषाणूमधून बरे झाले आहेत. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना लंडनमधील सेंट थॉमस रुग्णालयात 5 एप्रिलला भरती करण्यात आले होते. सुरवातीला त्यांनी घरातच स्वत:ला विलग करून घेतले होते. तसेच घरातून ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनाच्या परिस्थितीवर नजर ठेवून होते. कोरोनाची लागण झाल्यानंतरही त्यांनी अनेक बैठका घेतल्या. कोरोनाची लागण झालेले जॉन्सन हे जगातील पहिलेच पंतप्रधान होते.