पॅरिस - फ्रान्समधील शिक्षकाची हत्या करण्यापूर्वी त्यांना धमकी दिली होती, असा दावा स्थानिक वृत्तपत्रांनी केला आहे. शाळेतील मुलांना शिकवताना प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र दाखविल्याने पॅरिसजवळ एका शिक्षकाचा अज्ञात व्यक्तीने शिरच्छेद केला होता. हत्या करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव सॅम्युअल पॅटी(४७) असे असून त्यांच्या हत्येने देशात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ९ जणांना अटक केली आहे. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हल्लेखोर १८ वर्षीय चेचेने वंशाचा नागरिक असल्याच्या वृत्तास पोलिसांनी दुजोरा दिला आहे. शिक्षकावर चाकूने हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोराने 'अल्ला हो अकबर' अशी घोषणा दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हा हल्ला इस्लामिक दहशतवादी गटांकडून झाला असून अभिव्यक्ती स्वांतत्र्य विद्यार्थ्यांना शिकविल्यामुळे शिक्षकाची हत्या करण्यात आली, असे फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅकरॉन यांनी म्हटले आहे.
२०१५ साली व्यंगचित्रावरून वाद सुरू झाला
फ्रान्समधील शार्ली हेब्दो या साप्ताहिकाने २०१५ साली प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. त्यानंतर साप्ताहिकाच्या कार्यालयावर कट्टर धार्मिक दहशतवाद्यांकडून हल्ला झाला होता. यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील १४ आरोपींविरोधात आता सुनावणी सुरू झाली आहे. त्यामुळे व्यंगचित्राचा वाद पुन्हा उफाळून आला आहे.