ज्यूरिक - फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फॅन्तिनो आणि अॅटर्नी जनरल मायकेल लॉबर यांच्या अज्ञात बैठकीसंबंधी चौकशी करण्यात येत आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे (फिफा) प्रमुख जियानी इन्फॅन्तिनो यांनी फुटबॉल जागतिक प्रशासकीय मंडळ सदस्य संघटनेला पत्र लिहलं असून माझ्याकडे लपवण्यासारखे काहीच नसल्याचं म्हटलं आहे.
गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या फौजदारी चौकशीस कोणतेही आधार नाही, त्या बैठका कोणत्याही प्रकारे गुप्त नव्हत्या आणि बेकायदेशीरही नव्हत्या. फिफाविरोधात सुरु असलेल्या चौकशीला माझे पूर्ण समर्थन व मदत देण्यासाठी मी देशातील सर्वात वरिष्ठ कायदेशीर अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यासंदर्भात माझ्याकडे लपवण्यासारखे काहीच नाही, असे इन्फॅन्तिनो यांनी फुटबॉल जागतिक प्रशासकीय मंडळ सदस्य संघटनेच्या 211 सदस्यांना लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे.
लॉबर आणि इन्फॅन्तिनो 2016 मध्ये दोनदा भेटले होते. भेटीच्या काही काळापूर्वी इन्फॅन्तिनो फिफाच्या अध्यक्षपदी निवडले गेले होते. त्यानंतर दोघांची जून 2017 मध्ये देखील भेट झाली होती. तेव्हा लॉबर फुटबॉलच्या जागतिक संघटनेशी संबंधित भ्रष्टाचाराची चौकशी करीत होते.
दरम्यान, फौजदारी चौकशीची घोषणा झाल्यापासून कोणतीही माहिती मिळाली नाही आणि कोणत्याही सुनावणीसाठी समन्स बजावले गेले नसल्याचे इन्फॅन्तिनो यांच्या वकिलाने सांगितले.
कोण आहेत जियानी इन्फॅन्तिनो ?
जियानी इन्फॅन्तिनो यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघातील (फिफा) सेप ब्लाटर यांची 18 वर्षांची मक्तेदारी मोडून काढली होती. इन्फॅन्तिनो हे मूळचे इटलीचे असून स्वित्झर्लंड आणि इटलीचे त्यांच्याकडे नागरिकत्व आहे. इटली,जियानी इन्फॅन्तिनो फ्रेंच, जर्मन, इंग्लिश, स्पॅनिश आणि अरेबिक आदी भाषांवर त्यांची मजबूत पकड आहे. युरोपातील विखुरलेल्या फुटबॉल संघटनांना एकत्र आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. युरोपातील फुटबॉल विकासात प्लॅटिनींप्रमाणे इन्फॅन्तिनो यांचा सिंहाचा वाटा आहे.