लंडन - फायझर आणि बायोएनटेक या औषध निर्मात्या कंपन्यांकडून बनवल्या जाणाऱ्या कोविड लसीच्या सर्व चाचण्या सकारात्मक झाल्यास या वर्षाअखेर ही लस लोकांना उपलब्ध होईल, असे या लसीच्या निर्मात्यांनी सांगितले.
येत्या हिवाळ्याआधी लसीकरण होईल पूर्ण -
गेल्या आठवड्यात बायोएनटेक आणि सह-निर्माते फायझर यांनी सांगितले की ही लस ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रभावी आहे. जवळपास ४३ हजार जणांवर ही चाचणी करण्यात आली होती. बायोएनटेकचे सहसंस्थापक आणि सीईओ प्रो. उगुर साहिन यांनी माध्यमांना सांगितले की, आगामी एप्रिलपर्यंत देशात ३० कोटीपेक्षा जास्त डोस लोकांसाठी उपलब्ध होतील. तसेच उन्हाळ्यात संसर्ग कमी होईल, त्यामुळे येत्या हिवाळ्याच्याआधी आपण लसीकरणाचे काम पूर्ण करू शकतो. चाचण्यांमध्ये काही अडचणी न आल्यास या वर्षाअखेर किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही लस लोकांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. या लसीमुळे लोकांमधील कोरोनाचा संसर्ग कमी होईल, तसेच लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे विकसित होण्यावर अंकुश लावेल. सध्या हिवाळा असल्यामुळे या लसीचा प्रभाव जास्त दिसणार नाहीत, असेही उगुर साहिन यांनी सांगितले.
हेही वाचा - कोरोनाची लस खासगी डॉक्टरांनाही मोफत द्या; राज्य सरकारच्या त्या धोरणानंतर आयएमएचे पंतप्रधांना पत्र
काही दिवसांपूर्वीच लस प्रभावी ठरल्याचा केला होता दावा -
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणारी आपली लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचा दावा फायझर या औषध निर्मिती कंपनीने काही दिवसांपूर्वी केला होता. फायझरने ४३ हजार ५०० कोरोना रुग्णांना ही लस दोनवेळा दिली होती. त्यापैकी १० टक्क्याहून कमी रुग्णांना याची बाधा झाली तर ९० टक्के रुग्णांवर त्याचा योग्य परिणाम दिसून आला, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
फायझर अन्य जर्मन कंपनी बायोएनटेक सोबत कोरोनावर लस विकसित करत असून कोरोना रुग्णाला दुसरा डोस दिल्यानंतर सात दिवसांनंतर ९० टक्के रुग्ण बरे झाले. म्हणजे २८ दिवसानंतर रुग्णामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार झाल्याचे आढळून आले, असे फायझरचे म्हणणे आहे.
जगभरात ५ कोटी ४०, ६८ हजार लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित आहेत. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत १ कोटी ९ लाख ८ हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून २ लाख ४५ हजार ६०० जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - कोरोनावरील लसीच्या संशोधनाकरता ९०० कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद