नवी दिल्ली - अमेरिकेच्या लष्करी क्षमतेला चीन २०२५पर्यंत मागे टाकेल, असा अंदाज अमेरिकेन संसदेच्या संरक्षण विषयक समितीने व्यक्त केला आहे. सध्या जगात सर्वात मोठे लष्कर अमेरिकेचे आहे. तसेच त्यांचा लष्करी अर्थसंकल्पही जगात सर्वात जास्त आहे. चीन-अमेरिका वाद टोकाला पोहोचला असताना संसदेचा अहवाल समोर आला आहे.
अमेरिकेच्या संसदेने 'द फ्युचर ऑफ डिफेन्स टास्क फोर्स रिपोर्ट २०२०' नुकताच जाहीर केला आहे. चीन सतत आपल्या लष्करी ताकदीत वाढ करत असून पुढील पाच वर्षांत चीन अमेरिकेच्या लष्कराला मागे टाकेल, असा अंदाज समितीतील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. भविष्यात जर अमेरिकेच्या लष्कराची गती आता आहे तशीच राहिली तर चीन पुढे जाण्याची शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे. भविष्यात अमेरिकेने विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या क्षेत्रांत गुंतवणूक वाढवावी, असा सल्ला अहवालातून देण्यात आला आहे.
हाँगकाँग, तैवान, व्यापार युद्ध, दक्षिण चिनी समुद्र या विषयांवरून अमेरिका आणि चीनमधील संबंध मागील काही दिवसांपासून बिघडले आहेत. अमेरिकेचे अनेक लष्करी जहाजे दक्षिण चिनी समुद्रात चीनचा प्रभाव रोखण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. दोन्ही देशांतील वादानंतर आशियायी भू-राजकीय परिक्षेत्रात वेगाने घडामोडी घडत आहेत. चीन भारत सीमावाद सुरू झाल्यानंतर अमेरिकाचा भारताला पाठिंबा आहे. तर अनेक आशियायी राष्ट्रे चीन विरोधात एकवटली आहेत.