नवी दिल्ली - इस्लामिक धर्मगुरुंचा पर्दाफाश करणारा आणि पाकिस्तानात हिंदू समुदायावरील अत्याचाराविरोधात आवाज उठवणारे पाकिस्तानी पत्रकार अजय कुमार लालवाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. केशकर्तनालयात त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले.
पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू समुदायाशी संबंधित असलेल्या लालवाणी (वय 31) यांना सिंध प्रांतात 17 मार्च रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले.
हेही वाचा - अफगाणिस्तानात चकमकीत 36 ठार
लालवाणी रॉयल न्यूज टेलिव्हिजन वाहिनी तसेच, उर्दू वृत्तपत्र दैनिक पुचानो येथे पत्रकार म्हणून काम करत होते. त्यांचे गुरुवारी पोट, हात व गुडघ्यात लागलेल्या गोळ्यांच्या दुखापतीमुळे निधन झाले.
पोलिसांनी सांगितले की, केशकर्तनालयात केस कापत असतानाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांना अनेक गोळ्या लागलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गुरुवारी रात्री रुग्णालयात लालवाणी यांचे निधन झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना सुकुर शहरातील सालेह पट भागात घडली.
हेही वाचा - श्रीलंकेत प्रवासी बस पलटी झाल्याने 14 जणांचा मृत्यू