इस्लामाबाद - पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील आर्थिक संकट अधिकच तीव्र होत आहे. गरिबी ही पाकिस्तानची सर्वात मोठी समस्या बनली असून वीज बिल न भरल्यामुळे पाकिस्तानी पंतप्रधान सचिवालय कार्यालयाला वीज खंडित करण्याची नोटीस इस्लामाबाद वीज पुरवठा कंपनीने पाठवली आहे.
पाकिस्तान पंतप्रधान सचिवालयावर इस्लामाबाद वीज पुरवठा कंपनीचे तब्बल 41 लाख 13 हजार 992 रुपयांचे बिल थकलेले आहे. याचबरोबर गेल्या महिन्याचे 35 लाखांहून अधिक तर त्याही आधीच्या महिन्याचे 5 लाख 58 हजार रुपयांचे बिल थकीत आहे.
पंतप्रधान सचिवालय नियमीतपणे वीज बिल भरत नसून एखाद्या महिण्याचे बिल भरले जाते तर एखाद्या महिन्याचे बिल भरले जात नाही. यामुळे कार्यालयाचे वीज बिल थकीत पडले आहे. जर वेळेवर बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यामुळे पाकिस्तान सैरभैर झाला असून भारताला युद्धाची धमकी देत आहे. दुसऱ्यावर टीका करण्यात पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान इतके व्यस्त झाले आहेत की, त्यांना स्व:ताच्या देशातील समस्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही.