ऑकलँड : न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा जॅसिंडा अर्डर्न यांची निवड झाली आहे. भरघोस मतांनी ऐतिहासिक विजय प्राप्त करत त्यांनी आपले पंतप्रधानपद कायम राखले. यानंतर बोलताना, कोरोनाला दिलेल्या लढ्यामुळेच जनतेने आपल्या सरकारला पुन्हा संधी दिली, असे मत जॅसिंडा यांनी विजयानंतर व्यक्त केले.
ऑकलँडमधील त्यांच्या घराजवळील एका कॅफेमध्ये त्या बोलत होत्या. कोरोना महामारीविरोधात दिलेला लढा आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही केलेले प्रयत्न जनतेने पाहिले. त्यामुळेच मला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. पुढील तीन आठवड्यांमध्येच नवीन सरकार स्थापन करण्यात येईल; तसेच महामारीला तोंड देण्यालाच आपले प्राधान्य असणार आहे असे त्या म्हणाल्या.
कोरोनामुक्त म्हणून घोषित झालेला न्यूझीलंड पहिला देश ठरला होता. गेल्या तीन आठवड्यांमध्ये तिथे एकही नवा कोरोना रुग्ण आढळला नव्हता. मात्र, यानंतर एक नवा रुग्ण आढळून आल्याने, हे संकट अजूनही टळले नसल्याचे त्या म्हणाल्या. एक टीम म्हणून आम्ही सर्व याला कसा प्रतिकार करता येईल त्याकडे लक्ष केंद्रित करत आहोत, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
ऐतिहासिक विजय..
निवडणुकीमध्ये अर्डर्न यांच्या लिबरल लेबर पक्षाला ४९ टक्के मतं मिळाली. तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या कॉन्झर्वेटिव्ह नॅशनल पक्षाला केवळ २७ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. २४ वर्षांपूर्वी न्यूझीलंडने प्रोपोर्शनल व्होटिंग सिस्टीम स्वीकारली होती. त्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला एवढ्या प्रमाणात बहुमत मिळाले आहे. बहुतेक प्रमाणात पक्षांना युती करुन सरकार स्थापन करावे लागत होते. मात्र, यंदा लेबर पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करु शकणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जनादेश मिळाल्यामुळे आपल्यावरील अपेक्षाही वाढल्या असल्याचे जॅसिंडा यावेळी म्हणाल्या.
न्यूझीलंडमध्ये सर्वात कमी रुग्ण आणि बळी..
न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे दोन हजारांहून कमी रुग्ण आढळून आले होते. तसेच, २५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कडक लॉकडाऊन लागू केल्यामुळे न्यूझीलंड कोरोनामुक्त झालेला जगातील पहिला देश ठरला होता. यानंतर अर्डर्न यांचे जगभरातून कौतुक केले जात होते.
हेही वाचा : अफगाणिस्तानमध्ये भीषण स्फोट; १२ ठार, १००हून अधिक जखमी