सेऊल - उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी जगातील इतर देशांशी संबध सुधारण्याचा निर्धार केला आहे. पक्षाच्या नुकत्या झालेल्या बैठकीत त्यांनी याची गरज व्यक्त केली. जगातील देशांसोबत उत्तर कोरियाचे संबंध अत्यंत जलद गतीने सुधारायला हवेत, असे ते पक्षाच्या सर्वोच्च संस्था असलेल्या काँग्रेसच्या बैठकीत म्हणाले.
कोरिया सापडला आर्थिक संकटात -
कट्टर शत्रू असलेल्या दक्षिण कोरियासोबतही संबंध सुधारत असल्याचा दावा तेथील स्थानिक माध्यमांनी केला आहे. मात्र, त्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली याची माहिती देण्यात आली नाही. सध्या किम जोंग उन यांच्या नेतृत्त्वाखाली उत्तर कोरिया आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे इतर देशांशी संबंध सुधारण्याची गरज किम यांना पडली असावी.
सरकारच्या ध्येय धोरणांची बैठकीत चर्चा -
पक्षाच्या बैठकीत किम आणि सरकारच्या ध्येय धोरणांचीही माहिती दिली. कोरोनाच्या कठीण काळात बाह्य जगाशी चांगले संबंध असावेत, मग कट्टर शत्रु कोरियासोबतही चांगले संबंध असावेत असे मत त्यांनी व्यक्त केले. उत्तर कोरियांची काँग्रेस ही सर्वोच्च संस्था असून देशाचे सर्व निर्णय किम यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसकडून घेतले जातात.
युद्धखोरी आणि अणुहल्ल्याची धमकी -
अणूहल्ला आणि युद्धखोरीची भाषा किम जोंग उन यांच्या तोंडी कायम असते. दक्षिण कोरियासोबत तर उत्तर कोरियाचे शत्रुत्व सर्वश्रूत आहे. दोन्ही देशांत कायमच वादाची ठिणगी पेटत असते. काही दिवसांपूर्वी किम यांनी अमेरिकेवर अणुहल्ला करण्याचीही धमकी दिली होती. मात्र, नंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भेटही घेतली होती. उत्तर कोरियात काय घडत असते याची सहसा माहिती बाहेर पडत नसते. हुकूमशाही व्यवस्था असल्याने नागरिकांवर अनेक बंधने आहेत.