मुझफ्फराबाद - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला केल्यास त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तान पूर्णपणे तयार आहे. हम ईट का जवाब पत्थर से देंगे' अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमधील विधानसभेत ते बोलत होते.
काश्मीर मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे सत्य आम्ही जगासमोर मांडले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने कारवाई केली होती. त्याही पेक्षा मोठी कारवाई भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये करणार असल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही कोणतेही उल्लंघन सहन करणार नसून भारताने पाकिस्तान विरूध्द कारवाई केली, तर पाकिस्तान पूर्ण ताकदीने त्यास उत्तर देईल, असे खान म्हणाले.
भारत-पाकिस्तान दरम्यान युध्द झाले. तर त्यास आंतरराष्ट्रीय समुदाय जबाबदार असेल. काश्मीर आणि पाकिस्तानवर सर्व जगाचे लक्ष आहे. काश्मीर समस्येवर आंतरराष्ट्रीय समुदाय मौन बाळगून आहे. मात्र मी काश्मीरचा आवाज बनून संयुक्त राष्ट्र संघासह प्रत्येक जागतिक व्यासपीठावर हा मुद्दा उपस्थित करेल, असे खान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे शेवटचे कार्ड खेळून धोरणात्मक चूक केली आहे. मोदी आणि भाजपला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यांनी काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण केले आहे, असेही ते म्हणाले. याचबरोबर इम्रान खान यांनी भारतामधील मॉब लिंचिंगच्या मुद्यावरही भाष्य केले.